आजचा दिवस डॉक्टरांचा!


  • आजचा दिवस डॉक्टरांचा!
  • आजचा दिवस डॉक्टरांचा!
SHARE

असे म्हणतात की वकील आणि डॉक्टर यांच्यापासून कधीच काही लपवून ठेऊ नये. त्यातून नुकसान आपलेच होते. लहान बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत कुठल्याही वयोगटातील व्यक्ती असो प्रत्येकाला आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जावेच लागते. त्यामुळे डॉक्टरांची जागा आपल्या सर्वाच्याच आयुष्यात अबाधित आहे.

सध्या फॅमिली डॉक्टर ही संकल्पना विरळ होत चालली असली, तरी शारीरिक त्रासात प्रत्येकाला डॉक्टर नेहमीच जवळचा वाटतो. डॉक्टरांचे एवढे गुणगाण करण्यामागचे कारण म्हणजे आज आहे 'राष्ट्रीय चिकित्सक दिन' अर्थात 'नॅशनल डॉक्टर्स डे' . दरवर्षी 1 जुलैला ‘ राष्ट्रीय चिकित्सक दिन’ साजरा केला जातो.डॉ. रॉय यांच्या कार्याचा गौरव

भारताचे प्रसिद्ध चिकित्सक डॉ. बिधान चंद्र रॉय (डॉ.बी.सी.रॉय) यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 1 जुलै रोजी 'राष्ट्रीय डॉक्टर्स डे' साजरा करण्याचे केंद्र सरकारने 1991 साली ठरवले. त्यानुसार रॉय यांची जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो.


डॉक्टरांसोबत खटके

आजाराचे अयोग्य निदान, रुग्णांकडे ग्राहक या नजरेतून पाहणे, त्यांच्या आरोग्याशी हेळसांड करणे या आणि अशा असंख्य कारणांमुळे काही ठिकाणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे डॉक्टरांसोबत खटके उडून डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या घटना मागील काही काळात घडल्या आहेत.

यातून डॉक्टरांची प्रतिमा डागाळल्याचे म्हटले जात असले, तरी असे प्रकार अपवादात्मकच म्हणावे लागतील. कारण व्यक्ती शहरी असो किंवा ग्रामीण भागात राहणारी,  प्रत्येकाच्या आयुष्यात डॉक्टरांनी अनन्यसाधारण भूमिका बजावलेली आहे. सुसंवादातून तयार होणारे डॉक्टर आणि रुग्णामधले नाते आजही अनेक ठिकाणी जपले जात आहे.


फॅमिली डॉक्टर्स ही संकल्पना हळूहळू संपुष्टात येत आहे. पण कित्येकदा असेही होते की आमच्याकडे एखादा गरीब रुग्ण पैसे नसतानाही उपचारांसाठी येतो. कारण त्याला माहीत असते की, आपल्याजवळ सध्या पैसे नसले, तरी आपला डॉक्टर आपल्यावर उपचार करण्याचे नाकारणार नाही. माझे रुग्णांसोबत असेच जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यामुळे आजही अनेकजण मला केवळ भेटण्यासाठी म्हणून क्लिनिकमध्ये येतात.


- डॉ. पी. एन. हेगडे, फिजिशियन, सर्जन, फॅमिली डॉक्टर
सुरक्षेचा प्रश्न 

डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्नही सध्या चर्चेत आहे. आपल्या रुग्णाला सर्वोत्तम उपचार मिळावेत असे त्याच्या प्रत्येक नातेवाईकाला वाटते. त्यात थोडीही हेळसांड झाल्यास नातेवाईक त्रस्त होतात. त्यातूनच काही ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यात हलगर्जीपणा झाल्याने डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार घडतात.

यामुळे निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी रुग्ण, नातेवाईक यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहेच, पण त्याचसोबत त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही ‘मनी माईंड’ बदलणे गरजेचे आहे.


‘कट प्रॅक्टिस’ थांबवा

‘कट प्रॅक्टिस’बाबतही सध्या मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली जात आहे. प्रत्येक डॉक्टरने कमिशन घ्यायचे नाही असे स्वत:हून ठरवले, तर 'कट प्रॅक्टिस' थांबू शकेल. फक्त त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे.

'कट प्रॅक्टिस' या शब्दावरुन मला अक्षय कुमारचा 'गब्बर हा चित्रपट आठवतो. ज्यात डॉक्टर मेलेल्या एका माणसाला जिवंत आहे असं सांगून त्याच्या कुटुंबियांकडून पैसे उकळतात. 


निवासी डॉक्टरांवर होणारे हल्ले चुकीचे आहे.रुग्णाला वाचवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. पण काही वेळेस रुग्णाचे शरीर उपचारांना दाद देत नाही. ही बाब रुग्णाच्या नातेवाईकांनी समजून घेतली पाहीजे. निवासी डॉक्टर्स अगदी वाईट परिस्थितीत राहूनही दिवसभर आपले काम निष्ठेने करत राहतात. आजच्या 'डॉक्टरदिनी' डॉक्टर आणि रुणांचे नाते घट्ट करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यासह 'कट प्रॅक्टिस' थांबवण्यासाठीही प्रत्येक डॉक्टरने पुढाकार घेतला पाहिजे. जेणेकरून रुग्णांचे होणारे नुकसान थांबेल.


- डॉ. यशोवर्धन काब्रा, अध्यक्ष, सेंट्रल मार्ड


इतर क्षेत्रात छाप

मुळातच बुद्धीने तल्लख असलेल्या असंख्य डॉक्टर्सनी वैद्यकीय क्षेत्रासोबतच इतर क्षेत्रांमध्येही आपली छाप सोडली आहे. सिनेसृष्टीत तर अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी डॉक्टर अशी पदवी तर घेतली पण, प्रत्यक्षात अभिनेता म्हणूनही नावलौकीक मिळवला आहे. अगदी ताजे उदाहरण घ्यायचे झाल्यास आपल्या सर्वांना पोट भरुन हसवणाऱ्या 'डॉ. निलेश साबळे' याचे देता येईल. साबळे औषध जरी देत नसले, तरी आपल्या हास्य कार्यक्रमातून ते निरोगी राहण्याचा डोस प्रेक्षकांना देत असतात.


भक्तिभावाने रुग्णसेवा

शिवाय काही डॉक्टर्स असेही असतात, जे कसल्याही मोबदल्याचा विचार न करता भक्तीभावाने रुग्णांना सेवा देण्याचे काम करतात.


महालक्ष्मी मंदिरात मी मागील 18 वर्षांपासून रुग्णांना आरोग्य सेवा देत आहे. सिद्धिविनायक मंदिरात 15 वर्षे तर मुंबादेवी मंदिरात गेल्या 3 वर्षांपासून भाविकांना मोफत उपचार देत आहे. पंढरीला निघणाऱ्या वारीत आमचे सहकारी डॉक्टर्स 24 तास भाविकांना मोफत सेवा देतात. आमच्या विश्वस्थ ट्रस्टमधून हे सेवा देण्याचे काम सुरू आहे. केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही मोफत सेवा देण्याचे काम करत आहोत. आता आम्हाला शिर्डीलाही बोलावण्यात आले आहे.
- डॉ. सुनील हळूरकर, एम. डी. आयुर्वेदिक

म्हणूनच, आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या, देशातील तमाम डॉक्टरांना 'मुंबई लाइव्ह'कडून 'Happy doctor's day!'हे देखील वाचा -

'चुकलंच जरा डॉक्टर होऊन'


 

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या