Advertisement

पोटात घुसलेली सळई खांद्यातून बाहेर आली, तरीही 'तो' वाचला

नाशिकमधील लासलगाव इथं राहणारा सलिम शेख (३३) हा बांधकाम मजूर ८ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता पहिल्या मजल्यावरून खाली कोसळला. या अपघातात एक सळई त्याच्या पोटात घुसून थेट खांद्यातून बाहेर आली. या दरम्यान सलिम बेशुद्ध होता. अखेर जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी अथक प्रयत्नांनी ५ तासांच्या ऑपरेशननंतर सलिमच्या शरीरातून ही सळई बाहेर काढली.

पोटात घुसलेली सळई खांद्यातून बाहेर आली, तरीही 'तो' वाचला
SHARES

पोटात घुसून थेट खांद्यातून बाहेर आलेली सळई एका बांधकाम मजुराच्या शरीरातून यशस्वीपणे बाहेर काढण्यात जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांना यश आलं आहे.


कधी घडली घटना?

नाशिकमधील लासलगाव इथं राहणारा सलिम शेख (३३) हा बांधकाम मजूर ८ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता पहिल्या मजल्यावरून खाली कोसळला. या अपघातात एक सळई त्याच्या पोटात घुसून थेट खांद्यातून बाहेर आली. ४ फूट लांब आणि ८ मिलीमीटर जाडीची ही सळ सलिमच्या शरीरात घुसली होती. सहकारी मजुरांनी ही सळई कापून सलिमला नाशिकच्या रुग्णालयात दाखल केलं. पण तिथल्या डाॅक्टरांना सळई बाहेर काढण्यात यश येत नसल्याने त्यांनी सलिमला जे. जे. रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.



२० तास सळई शरीरात

त्यानुसार ९ मार्च रोजी दुपारी २ वाजता सलिमला जे. जे. रुग्णालयात आणण्यात आलं. या परिस्थितीतही सलिम जीवंत होता. सलिमच्या पोटातील आतडे, यकृत, फुफ्फूस आणि मानेला सळईने अक्षरशः चिरलं होतं. तब्बल २० तास ही सळई सलिमच्या शरीरात होती. या दरम्यान सलिम बेशुद्ध होता. अखेर जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी अथक प्रयत्नांनी ५ तासांच्या ऑपरेशननंतर सलिमच्या शरीरातून ही सळई बाहेर काढली.

सलिमच्या या शस्त्रक्रियेसाठी जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या २ टिमने अथक प्रयत्न केले. डॉ. अमोल वाघ, डॉ.ए.एच. भंडरवार , डॉ. उशा बडोले यांच्या टिमने ही अवघड शस्त्रक्रिया केली. सध्या सलिमची प्रकृती उत्तम असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा