कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील दिवंगत बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी उभारलेल्या आनंदवन आश्रमाला प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
मागील आठवडाभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आश्रमातील एकूण १,३१७ जणांची कोविड १९ चाचणी करण्यात आली. यापैकी २५१ जण कोविड १९ चाचणी अहवालात पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. तर २ जणांचा मृत्यू झाल्याचंही समजत आहे.
आनंदवनातील बहुसंख्य जण हे सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यामुळे या कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी आश्रमातील परिसरातच एक कोविड केंद्र उभारण्यात आलं आहे. सद्यस्थितीत आनंदवन आश्रमात १५०० जण आहेत.
हेही वाचा- परिस्थिती सुधारली नाही तर..., मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला लाॅकडाऊनचा इशारा
गेल्या वर्षभरापासून आनंदवनमध्ये बाहेरील लोकांना प्रवेश बंदी आहे. तरीही आनंदवनमध्ये कोरोनाने (coronavirus) शिरकाव केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. उपचारासाठी बाहेर गेलेल्या आनंदवनमधील एखाद्या व्यक्तीमुळे हा संसर्ग आत आल्याची आणि त्याचा इतरांना संसर्ग झाल्याची शक्यता आहे.
या महिन्याच्या सुरूवातीलाच आनंदवनात एक आरटीपीसीआर चाचणी केंद्र उभारण्यात आलं होतं. त्यानंतर दिवसाला १०० ते १५० जणांची या केंद्रात कोविड १९ चाचणी करण्यात येत होती. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात अनेकांचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर तात्काळ आनंदवन सील करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं.
याचसोबत जे व्यक्ती निगेटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना लगेच विशेष बसने वरोरातील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरणासाठी नेण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत १३० जणांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
नागरपूरमध्ये कोरोनाचा संसर्ग अत्यंत झपाट्याने फैलावत चालला आहे. बुधवारी १,७१० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ८ जणांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे.