Advertisement

संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण करण्यावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश


संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण करण्यावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
SHARES

विक्रमी संख्येने दर दिवशी कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत पात्र सर्व नागरिकांना लशीची पहिली मात्रा मिळालीच पाहिजे. कमीत कमी पहिली मात्रा देण्याचे, संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण करण्यावर भर देण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बुधवारी देशभरातील लसीकरणाचा आढावा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत संवाद साधला.

बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे. मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, करोनाविषयक कृती गटाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित आदी उपस्थित होते.

करोनाची साथ अजून गेलेली नाही, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही मात्रा घेण्यास प्राधान्य द्यावे असेही आवाहन ठाकरे यांनी केले.

आपापल्या जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्व स्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे असे असले तरी नागरिकांनी बेफिकीर राहू नये, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी चाचण्यांचे प्रमाण कमी होता कामा नये. राज्यातील विविध ठिकाणी  प्रयोगशाळा विकसित केल्या असून त्याचा वापर करायला हवा. लस घेण्याबरोबरच कोरोना सुसंगत वर्तन ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहीम राबवावी. चित्रपटगृह सुरू केली जात आहेत.

प्रत्येक चित्रपटगृहात लसीकरणाबाबत संदेश दाखविण्यात यावेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर लसीकरण मोहिमेत स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सहभाग घ्यावा. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर यांना लसीच्या दोन्ही मात्रा अनिवार्य करण्यात याव्यात. डोंगरी भागात मोबाइल युनिटच्या माध्यमातून लसीकरण करण्यात यावे अशा सूचना राजेश टोपे यांनी केल्या.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा