Advertisement

लस तुटवड्यामुळे सध्या दुसरी लस घेणाऱ्यांच प्राधान्य- अजित पवार

पहिली लस घेतलेल्या नागरिकांना दुसरी लस उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

लस तुटवड्यामुळे सध्या दुसरी लस घेणाऱ्यांच प्राधान्य- अजित पवार
SHARES

‘कोरोना’च्या (coronavirus) संभाव्य ‘तिसऱ्या लाटे’ची शक्यता गृहीत धरुन आरोग्य विभागाने सतर्क रहावं, अशा सूचना देऊन या लाटेत लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य नियोजन करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले.

पुण्यातील  कौन्सिल हॉल इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने ४५ वर्षांवरील नागरिकांबरोबरच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी राखून ठेवण्यात आला आहे. परंतु सध्या मर्यादित स्वरुपात लस उपलब्ध होत आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण सुरळीतपणे होईल. पहिली लस घेतलेल्या नागरिकांना दुसरी लस उपलब्ध करुन देण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा- राज्यात १८ ते ४४ वयोगटाच्या टप्प्यातही वयानुसार लसीकरण?, आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत!

रुग्णांच्या नातेवाईकांकडे इंजेक्शन मागू नका

कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना सरसकट सर्व रुग्णांच्या नातेवाईकांकडे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी करता कामा नये, असं सांगून रेमडेसिवीरबाबतीत गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांची तपासणी करुन दोषी रुग्णालयावर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याबरोबरच काही रुग्णालये बिला साठी मृतदेह अडवून ठेवल्याचं आढळल्यास अशा रुग्णालयांवरही कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

गरजूंना मदत पोहोचवा

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी स्वतःहून नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं आहे.  ऑक्सिजन युक्त व व्हेंटिलेटरयुक्त उपलब्ध खाटा, उपलब्ध लस याविषयी समन्वय ठेवून नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवा, असं आवाहनही त्यांनी केलं. कोरोना महामारीच्या संकटकाळात गरजूंना अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वितरीत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, असंही अजित पवार (ajit pawar) यांनी सांगितलं.

आरोग्य सुविधा वाढवा

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना वैद्यकीय सेवा सुविधा अपुऱ्या पडू नयेत, याची दक्षता घेऊन काटेकोरपणे नियोजन करा, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व शासकीय यंत्रणेला दिले. त्याचबरोबर आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता व रेमडेसिवीर इंजेक्शन आदी वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक तयारी करा, असंही त्यांनी सांगितलं.

 
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा