Advertisement

सह्याजीराव पॅथाॅलाॅजिस्टच्या एमएमसी मुसक्या आवळणार; परिपत्रक जारी

पॅथाॅलाॅजिस्ट आपल्या सह्यांच्या गैरवापर करत रूग्णांची आर्थिक फसवणूक करण्याबरोबरच चुकीच्या निदानाद्वारे रूग्णांच्या जीवाशी खेळ करत असल्याचं सातत्यानं पुढं येत आहे. त्यामुळं या सह्याजीराव पॅथाॅलाॅजिस्टच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत होती.

सह्याजीराव पॅथाॅलाॅजिस्टच्या एमएमसी मुसक्या आवळणार; परिपत्रक जारी
SHARES

मुंबईत राहणाऱ्या, मुंबईत कार्यरत असलेल्या पॅथाॅलाॅजिस्टची सही पुणे, नाशिक, नागपूर अशा ठिकाणच्या पॅथाॅलाॅजी लॅबमधील रक्त आणि इतर चाचण्याच्या अहवालावर असते. तर नागपुरमध्ये राहणाऱ्या, कार्यरत असलेल्या पॅथाॅलाॅजिस्टची सही मुंबई, सातारा, कोल्हापूर वा इतर ठिकाणच्या चाचण्यांच्या अहवालावर असते. हे खरं वाटत नसलं तरी हेच खरं आहे.


पॅथाॅलाॅजिस्टचा सह्यांचा गैरवापर

पॅथाॅलाॅजिस्ट आपल्या सह्यांच्या गैरवापर करत रूग्णांची आर्थिक फसवणूक करण्याबरोबरच चुकीच्या निदानाद्वारे रूग्णांच्या जीवाशी खेळ करत असल्याचं सातत्यानं पुढं येत आहे. त्यामुळं या सह्याजीराव पॅथाॅलाॅजिस्टच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत होती. त्यानुसार अखेर महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल (एमएमसी) अर्थात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं सह्याजीराव पॅथाॅलाॅजिस्टच्या मुसक्या आवळण्यासाठी नुकतंच एक परिपत्रक जारी केलं आहे.


परिक्षण न करताच सह्या 

या परिपत्रकानुसार एकाचवेळी अनेक ठिकाणी एखाद्या पॅथाॅलाॅजिस्टच्या सह्या आढळल्यास, चाचण्यांचं परिक्षण न करताच सह्या ठोकल्याचं सिद्ध झाल्यास अशा पॅथाॅलाॅजिस्टविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशा पॅथाॅलाॅजिस्टविरोधात कारवाई करण्याच्यादृष्टीनं हे परिपत्रक काढण्यात आल्याची माहिती एमएमसीचे अध्यक्ष डाॅ. शिवकुमार उत्तुरे यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.


रूग्णांना आर्थिक फटका 

मुंबईसह राज्यभर सध्या बोगस पॅथाॅलाॅजी लॅब आणि बोगस पॅथाॅलाॅजिस्टचा सुळसुळाट झाला आहे. बोगस लॅब आणि बोगस पॅथाॅलाॅजिस्टकडे जाणाऱ्या रूग्णांना चांगला आर्थिक फटका बसत असून चुकीच्या आजाराच्या निदानामुळं त्यांच्या जीवही धोक्यात येताना दिसत आहे. त्यामुळं आता या बोगस पॅथाॅलाॅजिस्टला आणि बोगस पॅथाॅलाॅजी लॅबला आळा घालण्याची गरज आहे. पण त्याचवेळी या बोगस पॅथाॅलाॅजी लॅब आणि बोगस पॅथाॅलाॅजिस्टचं काही अधिकृत पॅथाॅलाॅजिस्टमुळंच फावत असल्याचं समोर येत आहे.


नवी मुंबईतील परवाना रद्द 

अधिकृत पॅथाॅलाॅजिस्ट आपल्या डिजिटल सह्यांचा वापर करण्याची मुभा स्वार्थापोटी बोगस पॅथाॅलाॅजिस्ट लॅब आणि बोगस पॅथाॅलाॅजिस्ट देत असल्याचं सिद्ध झालं आहे. अशा अनेक तक्रारी एमएमसीकडे आल्या आहेत. तर नुकताच एमएमसीनं अशाच एका नवी मुंबईतील सह्याजीरावाचं परवाना रद्द करत त्याला दणका दिला आहे.


डाॅक्टरांना कारवाईचा इशारा

या सर्व पार्श्वभूमीवर आणि चाचण्यांवर अधिकृत पॅथाॅलाॅजिस्टची सही असायला हवी या सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार एमएमसीनं आठवड्याभरापूर्वी वरील परिपत्रक काढलं आहे. चाचण्यांवर अधिकृत पॅथाॅलाॅजिस्टच्याच सह्या हव्यात, तसंच एकाच वेळी अनेक ठिकाणच्या चाचण्यांवर सह्या केल्या जात असल्याचं आढळल्यास कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत एमएमसीनं या परिपत्रकाद्वारे दिले आहे. तर डाॅक्टरांनीही अधिकृत पॅथाॅलाॅजिस्टकडेच रूग्णांना पाठवावं अन्यथा अशा डाॅक्टरांनाही कारवाईला सामोरं जावं लागेल असंही डाॅ. उत्तुरे यांनी स्पष्ट केलं आहे.


रूग्णांनीही काळजी घ्यावी

 एमएमसीच्या या निर्णयाचं महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथाॅलाॅजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलाॅजिस्ट संघटनेनं स्वागत केलं आहे. या परिपत्रकानुसार सह्याजीरावांविरोधात कडक कारवाई झाली तर नक्कीच बोगस लॅब आणि बोगस पॅथाॅलाॅजिस्टला आळा बसेल आणि रूग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबेल, त्यांची आर्थिक लुट-फसवणूक थांबेल असं असोसिएशनचे सदस्य डाॅ. प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितलं आहे. तर रूग्णांनीही आपण अधिकृत लॅबमध्येच जातोय ना याची काळजी घ्यावी असं आवाहनही डाॅ. कुलकर्णी यांच्यासह डाॅ. उत्तुरे यांनी केलं अाहे.



हेही वाचा -

टीबीचे रूग्ण मधूनच सोडत अाहेत उपचार; प्रजा संस्थेचा अहवाल 

अमन बनण्यासाठी बीडवरून रूक्सार मुंबईत दाखल




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा