Advertisement

डाॅक्टरांनो, रूग्णांना अधिकृत पॅथाॅलाॅजी लॅबमध्येच पाठवा, नाही तर याल गोत्यात...

कमिशनपोटी बोगस लॅबमध्ये रुग्णांना पाठवल्याचं निदर्शनास आल्यास डाॅक्टर गोत्यात येऊ शकतात. कारण अशा प्रकरणांत डाॅक्टरची नोंदणी तात्पुरती रद्द होण्यासोबतच त्यांच्यावर गुन्हाही दाखल होणार आहे.

डाॅक्टरांनो, रूग्णांना अधिकृत पॅथाॅलाॅजी लॅबमध्येच पाठवा, नाही तर याल गोत्यात...
SHARES

रक्त तपासणी वा इतर चाचण्यांसाठी डाॅक्टर बऱ्याचदा आपल्याच ओळखीतल्या पॅथाॅलाॅजी लॅबमध्ये रुग्णांना पाठवतात. याचं कारण म्हणजे डाॅक्टर आणि पॅथाॅलाॅजी लॅबमधील साटंलोटं आणि त्यातून डाॅक्टरांना मिळणारं कमिशन. परंतु आपण रुग्णांना ज्या लॅबमध्ये पाठवतो आहे, ती लॅब अधिकृत आहे का? तिथे अधिकृत पॅथाॅलाॅजिस्ट आहेत का? हेही पाहिलं जात नाही. पण केवळ कमिशनपोटी अशा लॅबमध्ये रुग्णांना पाठवल्याचं निदर्शनास आल्यास डाॅक्टर गोत्यात येऊ शकतात. कारण अशा प्रकरणांत डाॅक्टरची नोंदणी तात्पुरती रद्द होण्यासोबतच त्यांच्यावर गुन्हाही दाखल होणार आहे.


डाॅक्टरांना तंबी

बोगस पॅथाॅलाॅजिस्ट, बोगस पॅथाॅलाॅजिस्टला आळा घालण्यासह रुग्णांची आर्थिक लूट थांबावी तसंच आजाराचं योग्य निदान होऊन रूग्णांना त्वरीत उपचार मिळावेत या उद्देशानं इंडियन मेडिकल काऊन्सिलने एक पत्र जारी करत अधिकृत लॅब आणि पॅथाॅलाॅजिस्टकडेच रूग्णांना पाठवा, अशी तंबीच डाॅक्टरांना दिली आहे.


आर्थिक लूटही सुरू

मुंबईसह राज्यभर बोगस पॅथाॅलाॅजी लॅब आणि बोगस पॅथाॅलाॅजिस्टचा सुळसुळाट आहे. या बोगस लॅबच्या माध्यमातून तंत्रज्ञ, बोगस पॅथाॅलाॅजिस्ट आणि डाॅक्टराचं उखळं पांढरं होत असल्यानं असे अनधिकृत व्यवसाय सध्या तेजीत सुरू आहेत. अशा बोगस पॅथाॅलाॅजी लॅबमध्ये रूग्णांना पाठवलं आणि आजाराचं योग्य निदान झालं नाही तर रूग्णांच्या जीवावर बेतत असल्याचंही वारंवार समोर आलं आहे. शिवाय या बोगस लॅब रुग्णांची आर्थिक लूटही करत असल्याचं चित्र आहे.



या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल काऊन्सिलनं नुकतच एक पत्र काढत अधिकृत लॅबमध्येच रुग्णांना पाठवण्याचे आदेश दिले आहेत. बोगस लॅबमधील चाचण्यांच्या अहवालानुसार रूग्णांना उपचार देताना वा बोगस पॅथाॅलाॅजी लॅबमध्ये पाठवल्याचं काऊन्सिलच्या तपासणीत उघड झालं, तर त्या डाॅक्टरचा परवाना तात्पुरता रद्द केला जाणार आहे.


आरोग्य क्षेत्रातून स्वागत

सोबत पॅथाॅलाॅजिस्टविरोधात बोगस डाॅक्टर म्हणून कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल काऊन्सिलच्या हा निर्णय रुग्णांना दिलासा देणारा आणि बोगस लॅबला आळा घालणारा असल्याचं म्हणत या निर्णयाचं आरोग्य क्षेत्रातील संघटनांकडून स्वागत होत आहे. तर या निर्णयाची योग्य ती अंमलबजावणी होण्याची आशाही या निमित्ताने व्यक्त होत आहे.



हेही वाचा-

बोगस पॅथाॅलाॅजी लॅबला दणका कधी?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा