Advertisement

'थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत गोळ्यांचा पुरवठा राज्यभर सुरू करा'


'थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत गोळ्यांचा पुरवठा राज्यभर सुरू करा'
SHARES

राज्यभरातील थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची नेमकी आकडेवारी किती आहे आणि या सर्व रुग्णांना त्यांच्या गावाजवळच्या आरोग्य केंद्रात मोफत गोळ्या उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने नियोजन करण्यात यावं, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी शनिवारी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.


बैठकीला यांची उपस्थिती

थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांसाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांचे पालक आणि स्त्रीरोग तज्ज्ञांची FOGSI ही संघटना यांच्यासमवेत मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस राज्याचे आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे, सहाय्यक संचालक डॉ. रेगे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात, स्त्रीरोग तज्ज्ञांच्या संघटनेचे सचिव डॉ. जयदीप शंक, थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांच्या पालकांचे प्रतिनिधी सुनील वर्तक आदी उपस्थित होते.


थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची संख्या?

सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यात थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची संख्या ही सुमारे ८ हजार ५०८ इतकी आहे. पण ही संख्या सुमारे ३० हजार इतकी असण्याची शक्यता बैठकीत वर्तवण्यात आली. त्यामुळे थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची माहिती अद्ययावत करण्यात यावी, अशी सूचना यावेळी राज्यमत्र्यांनी केली.

गोळ्यांची आवश्यकता लक्षात घेऊन हाफकीन संस्थेकडे तशी मागणी तात्काळ नोंदवण्यात यावी. ही कार्यवाही तातडीने करावी आणि थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना राज्यमंत्री देशमुख यांनी आरोग्य संचालकांना दिल्या.


प्रबोधनासाठी मोहीम राबवावी

राज्यमंत्री देशमुख म्हणाले, थॅलेसेमिया आजाराचे प्रमाण वाढत आहे. मुलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. या आजाराबाबत गरोदरपणात काळजी घेतल्यास तो टाळता येऊ शकतो. यासाठी महिलांनी गरोदरपणाच्या काळात थॅलेसेमिया मायनर ही चाचणी करणे हिताचे आहे. एखाद्या गरोदर महिलेत हिमोग्लोबीनचं प्रमाण कमी आढळल्यास डॉक्टरांनीही थॅलेसेमीया संदर्भातील चाचण्या करून घेण्याबाबत सजग असणे आवश्यक आहे.

या आजाराचे वाढते स्वरुप आणि त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याबाबत मोठी प्रबोधन मोहीम राबवणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने विविध प्रसिद्धी माध्यमांमधून तशी प्रबोधन मोहीम राबवून लोकांना तसेच डॉक्टरांनाही या आजाराबाबत सजग करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


'महिन्याभराच्या गोळ्या एकत्रीत द्या'

या आजारासंदर्भात गोळ्यांशिवाय इतर औषधोपचारही उपलब्ध करून दिले जावेत. तसेच रुग्णांना आठवड्याभराऐवजी महिन्याभराच्या गोळ्या एकत्रीत द्याव्यात, त्यामुळे त्यांना वारंवार आरोग्य केंद्रात यावं लागणार नाही आणि औषधोपचारामध्ये देखील खंड पडणार नाही, अशा सूचनाही राज्यमंत्री देशमुख यांनी यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या रुग्णांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यवाही केंद्र शासनाच्या नियमावलीनुसार करण्यात यावी, असंही त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं.


हेही वाचा - 

'बोन-मॅरो ट्रान्सप्लांट'ची मोफत सुविधा हवीय, मग इथे या!संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा