मुंबईत कुष्ठरोगाचा प्रभाव वाढतोय!

  Mumbai
  मुंबईत कुष्ठरोगाचा प्रभाव वाढतोय!
  मुंबई  -  

  मुंबईत दरवर्षी जवळपास 450 नवीन कुष्ठरोग रुग्णांची नोंद होत आहे. तर, यातील फक्त 25 टक्के रुग्ण हे मुंबई बाहेरुन उपचारासाठी येतात, अशी माहिती राज्याच्या आरोग्य सेवा विभागाचे संचालक (कुष्ठरोग) डॉ. राजू जोतकर यांनी दिली आहे. तर, मुंबईतील एम पूर्व आणि एल विभागात कुष्ठरोग झालेल्या रुग्णांची संख्या सर्वात जास्त असल्याचं आढळून आलं आहे, असं जिल्हा वैद्यकीय पर्यवेक्षक डॉ. वासीकर यांनी सांगितलं आहे.  

  कुष्ठरोगाची लागण झालेल्या रुग्णांना आधी वाळीत टाकायची पद्धत होती. याच पार्श्वभूमीवर अशा रुग्णांना शोधून काढून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी केंद्र सरकारने जिल्हा आरोग्य विभागामार्फत ‘कुष्ठरोग शोध मोहीम’ सुरू केली. या मोहिमेअंतर्गत रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येतात. पण, तरीही दरवर्षी मुंबईत जवळपास 450 नवीन कुष्ठरोग रुग्णांची नोंद करण्यात येते.


  कुष्ठरोग म्हणजे काय ?

  • ‘कुष्ठरोग’ हा संसर्गजन्य आजार
  • मायक्रोबॅक्टेरियम लेप्रे या जंतूमुळे होणारा हा आजार
  • हा जंतू शरीरात शिरकाव करून रोगाची लक्षणे दिसेपर्यंत 9 ते 10 वर्षे निघून जातात
  • कुष्ठरोगाचा जंतू त्वचेसह चेतातंतूमध्ये शिरून हळूहळू वाढतो
  • चेतातंतू नष्ट होऊन अंगावर चट्टे उठू लागतात
  • हातापायाच्या संवेदना कमी होऊन बधीरपणा येतो
  • संवेदनशील झालेल्या जागी जखम झाली तर ती चिघळते
  • अनेक वर्ष उपचार न केलेल्या रुग्णांची हाता-पायाची बोटंही झडलेली असतात

  कुष्ठरोग हा संसर्गजन्य आजार असल्याने या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीलाही हा आजार होऊ शकतो. मुंबईतील ‘एम’ (पूर्व) या विभागातील मानखुर्द, ट्रॉम्बे, देवनार या परिसरात, तर कुर्ल्यातील ‘एल’ विभागात कुष्ठरोग रुग्णांची सर्वाधिक नोंद करण्यात आल्याची माहिती डॉ. वासीकर यांनी दिली आहे.


  हवेतून पसरणारा हा जंतू आहे. ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. त्या व्यक्तीच्या शरीरात हा जंतू कायमस्वरुपी राहिला तरी काहीच होत नाही. मुंबईत दरवर्षी सरासरी 450 रुग्णांची नोंद करण्यात येते. कुष्ठरोगाची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात आणून लगेच त्यांच्यावर उपचार सुरू केले जातात. कुष्ठरोगावर वेळेत उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो. 

  डॉ. वासीकर, जिल्हा वैद्यकीय पर्यवेक्षक

  तसंच, या आजाराबद्दल अद्यापही लोकांमध्ये जागरुकतेचा अभाव आहे. अंगावर चट्टे येऊन ते सुजणे, अंगावर गाठी उठणे, नसा दुखणे अशी लक्षणे दिसून येत असली, तरी रुग्ण डॉक्टरांकडे जात नाहीत. त्यामुळे काही आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक, आशा सेविका घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या आरोग्याची तपासणी करत असल्याचं डॉ. वासीकर यांनी स्पष्ट केलं आहे.


  आमच्या रुग्णालयात गेल्या 40 ते 50 वर्षांपूर्वी आलेले रुग्ण आहेत. या रुग्णांना कुष्ठरोग झाल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांना सोडले होते. त्यांची रुग्णालयाने राहण्याची सोय केलीय. आता ते सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच जीवन जगत आहेत. पण, कुष्ठरोगाबाबत लोकांमध्ये असलेल्या गैरसमजुतींमुळे या व्यक्तींना समाज स्वीकारत नाही. या रुग्णालयात अद्याप कुठल्याही नवीन रुग्णांची नोंद झालेली नाही.

  डॉ. अमिता पेडणेकर, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक, अॅक्वर्थ महापालिका कुष्ठरोग रुग्णालय  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.