Advertisement

किशोरवयीन मुलींना उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावरचे उपाय!


किशोरवयीन मुलींना उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावरचे उपाय!
SHARES

१२ ते १४ या वयोगटात मुलींचा शारिरीक, मानसिक आणि भावनिक विकास होत असतो. त्यामुळे या वयातील मुलींना समजावून सांगणं, त्यांच्यावर चांगले संस्कार करणं गरजेचं असतं. यासाठी आई-वडिलांनी किशोरवयातल्या आपल्या मुलीला विश्वासात घेऊन तिच्याशी या विषयावर चर्चा करणंही महत्त्वाचं असतं.

या वयोगटातील मुलींमध्ये मासिक पाळी अनियमितता, वजन वाढणं अशा समस्या उद्भवतात. पण, त्यावर योग्य वेळी उपाय करणंही गरजेचं असतं. या विषयी मुंबई लाइव्हने कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून त्यांनी किशोरवयीन मुलींना काय समस्या होतात? आणि त्यावर कोणते उपचार घ्यावेत? याविषयी सल्ला दिला आहे.


अनियमित मासिक पाळी 

जेव्हा मुलीला मासिक पाळी येते, तेव्हा तिच्या हार्मोन्सध्ये बरेच बदल होत असतात. मुलींच्या 'हायपोथेलॅमी पिटुटॅरिअो युअॅरिन अॅक्सेस'मध्ये बरेच बदल होतात. जोपर्यंत तो नीट सेट होत नाही, तोपर्यंत समस्या येऊ शकतात. त्यामुळे मासिक पाळीत अनियमितता येऊ शकते. अशावेळी हार्मोन्सची तपासणी करणं गरजेचं असतं. याव्यतिरिक्त, त्यांचं काऊन्सेलिंग केलं जाऊ शकतं. त्यातून ९९ टक्के मुलींची मासिकपाळी नियमित होऊ शकते. त्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यायचा, अॅक्सेस सेट झाला की अनियमित मासिक पाळीची समस्या कमी होते. या समस्येसाठी जास्त पॅनिक व्हायची गरज नाही.


मासिक पाळीत रक्तस्त्राव अधिक होणं

१൦ ते १५ टक्के मुलींमध्ये मासिक पाळीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो. याला वैद्यकीय भाषेत 'प्युरिअटी मेजोरेजिया' असं म्हणतात. अशा परिस्थितीत तपासणी करणं गरजेचं असतं. म्हणजे रक्तात काही दोष आहे का? रक्त न थांबण्याच्या काही प्रक्रिया आहेत का? त्यासाठी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.


वजन वाढणं 

ओबेसिटी (लठ्ठपणा) हा मुला-मुलींमध्ये झपाट्याने वाढणारा आजार आहे. बऱ्याचदा मासिक पाळी नियमित येत नाही म्हणून हार्मोन्सच्या गोळ्या दिल्या जातात. त्यामुळे मुलींचं वजन वाढू शकतं. शिवाय, हल्लीची मुलं काहीच शारिरीक हालचाल करत नाहीत. म्हणजे मैदानी खेळ खेळत नाही. कारण जास्त लक्ष टेक्निकल गोष्टींकडे वळलेलं आहे. मैदानी खेळ सोडून सतत मोबाईल, टीव्ही, व्हॉट्स अॅप, फेसबुक, टॅब, कार्टून्स हे तासनतास बघत बसतात. त्यावर आई-वडिलांनी नियंत्रण आणलं पाहिजे. धावणे, सायकलिंग असे खेळ खेळणंही गरजेचं आहे.

वजन वाढण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आहार. फास्ट फूड खाण्याकडे मुलांचा जास्त कल असतो. तळलेले पदार्थ म्हणजे, पिझ्झा, चॉकलेट, बर्गर, पेस्ट्रीज, चिप्स अशा पदार्थांचं अतिसेवन केलं जातं. पण, हे न खाता त्यांनी घरातला सकस आहार म्हणजेच, पोळी-भाजी, फळ, भाजी अशा पदार्थांचं सेवन वाढवलं पाहिजे. त्यासाठी आई-वडिलांनी योग्य त्या सवयी लावणं गरजेचं आहे.


आई - वडिलांची भूमिका महत्त्वाची

आताच्या पिढीला सर्व गोष्टी एका क्लिकवर उपलब्ध होतात. या वयोगटातील मुलं खरंतर खूप निरागस असतात. या वयात शारिरीक, मानसिक आणि भावनिक बदल होत असतात. त्यांना तेवढं माहीत नसतं. त्यामुळे या विषयी आई-वडील आणि पाल्य यांमध्ये चर्चा, संवाद होणं महत्त्वाचं असतं. जर, ते एखाद्या अडचणीबद्दल आई-वडिलांशी बोलले नाहीत, तर ते याबाबत आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगतात किंवा इंटरनेटवर बघून त्याबद्दलची माहिती काढण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस त्यांना योग्यच माहिती मिळेल असं नाही.


...म्हणून वाढतं व्यसनाचं प्रमाण 

आई - वडिलांशी संवाद होत नसल्यामुळे इंटरनेट किंवा मित्रांच्या साथीने अनेकदा ही मुलं व्यसनाच्या अधीन जातात. त्यातून धूम्रपान, मद्यपान, ड्रग्ज घेण्याचं प्रमाण वाढतं. या व्यतिरिक्त, मुलींमध्ये पिल्स घेण्याचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे ही आई-वडील, समाज, शैक्षणिक पद्धत सर्वांचीच जबाबदारी आहे की मुलांना आपण कशापद्धतीने या सर्वांपासून दूर ठेऊ शकतो.


मुलींना होऊ शकतं युरिनरी ट्रॅक्ट इंन्फेक्शन 

अनेकदा मुली खूप घट्ट जिन्स घालतात. त्यामुळे बऱ्याचदा त्या लघवीला जात नाहीत. त्यातून त्यांना युरिनरी ट्रॅक्ट इंन्फेक्शन होऊ शकतं. त्यासाठी कपडे घालण्याबाबतही त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. लूज कपडे घालणे, कपडे स्वच्छ धुऊन घालणे याचबरोबर युरिनरी ट्रॅक्ट इंन्फेक्शन वाटत असेल, तर भरपूर पाणी पिणे, डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे गरजेचं असतं.


मुलींमध्ये पॉलिस्टेस्टिक ओव्हेरियनडिसिजचं वाढतं प्रमाण 

ओबेसिटी, हार्मोनल बदल यामुळे पॉलिस्टेस्टिक ओव्हेरियन डिसीज होण्याचं प्रमाण वाढू शकतं. ओव्हेरिज (अंडाशय)मध्ये गाठ (सिस्ट) असेल तर ते सोनोग्राफी केल्यानंतर कळू शकतं. याची कारणं लक्षात घेऊन वजन कमी करणं, योगा, डाएट, व्यायाम, प्राणायाम या सगळ्यामुळे याचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही, असा सल्लाही 'डॉ. कटके' यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिला.



हेही वाचा

तरूणांनो स्टेरॉईड नको, नैसर्गिक व्यायाम करा- प्रशांत तळवळकर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा