Advertisement

तरूणांनो स्टेरॉईड नको, नैसर्गिक व्यायाम करा- प्रशांत तळवळकर


तरूणांनो स्टेरॉईड नको, नैसर्गिक व्यायाम करा- प्रशांत तळवळकर
SHARES

'तूप खाऊन कधी रुप येत नाही', या म्हणीला जोडून 'जीममध्ये गेल्यागेल्या कुणी बॉडी बिल्डर' होत नाही, या आधुनिक म्हणीचीही जोड दिली पाहिजे, अशीच सध्याची परिस्थिती आहे. कॉलेज सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने जीममधील नेहमीच्या गर्दीत सध्या किशोरवयीन मुला-मुलींची चांगलीच भर पडली आहे.


चुकीचे मार्गदर्शन

आजचे तरूण हेल्थ कॉन्शिअस असल्याने व्यायाम आणि डाएटवर त्यांचे विशेष लक्ष आहे, असे म्हटले जाते. पण अनेकदा चुकीच्या मार्गदर्शनामुळे हेच तरूण भरकटतात आणि स्वत:च्या शरीराची हानी करून घेतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्यायाम केल्यानंतर पिळदार शरीर कमावण्याच्या नादात किंवा वजन घटवण्यासाठी तरूण पिढीकडून होणारा स्टेरॉईड्सचा अनावश्यक वापर.

सध्याचा जमाना फास्टफुडचा आहे, हे विसरून तरी कसे चालेल? त्यामुळे जीममध्ये घाम गाळतानाच किती दिवसांत बॉडी बिल्डर बनू? अशी ट्रेनरकडे हळूच विचारणा करतानाही हे तरूण दिसतात. मग काय वर्ष-दोन वर्षांत 'प्रोफेशनल ट्रेनर' अशा शिक्का परस्पर मारून मोकळे झालेले हे कथित मार्गदर्शक या तरूणांना सप्लिमेंट्स आणि स्टेरॉईड्सा पर्याय सुचवतात. तेथूनच पुढे पैसे आणि शरीर या दोघांचीही अपरीमित हानी व्हायला सुरूवात होते.



पिळदार तरीही बनावट...

स्टेरॉईड्सच्या सेवनाने अल्पावधीत शरीराला कितीही सुबक, बनावट आकार देता येत असला, तरी काही कालावधी उलटून गेल्यानंतर हेच स्टेरॉईड आपले दुष्परिणामही तितक्याच परिणामकपणे दाखवू लागतात. मग केलेल्या चुकांची जाणीव व्हायला सुरूवात होते.

मात्र, खरे मार्गदर्शक कधीच कुणाची फसवणूक करत नाही, हे देखील तितकेच खरे. म्हणूनच स्टेरॉईड घेण्यापेक्षा व्यायामानंतर नैसर्गिक आहारावरच भर देण्याचा सल्ला 'तळवळकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस'चे एमडी आणि सीईओ प्रशांत तळवळकर यांनी तरूणांना दिला आहे.

फिटनेस इंडस्ट्रीत प्रसिद्ध असलेली 'तळवळकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेड' लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायविस्तार करणार आहे. मंगळवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात 'तळवळकर्स' आणि यूएसमधील 'स्नॅप फिटनेस'सोबतच्या भागीदारीची घोषणा करण्यात आली. त्यानिमित्ताने प्रशांत तळवळकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.



अतिआत्मविश्वास घातक

आजच्या तरूणांमध्ये आत्मविश्वास ठासून भरला आहे. त्यामुळे आपण मनात आणले, तर काहीही करू शकतो, असे तरूणांना वाटते. हा सकारात्मक आत्मविश्वास नक्कीच चांगला आहे. पण स्टेरॉईड घेऊन पिळदार शरीर बनवण्याच्या बाबतीत मात्र हा अतिआत्मविश्वास घातक ठरू शकतो.


कमवा नैसर्गिक तब्येत

बऱ्याचदा तरूणांना असेही वाटते की शरीर सुदृढ असल्याने आपण काहीही सहज पचवू शकतो. पण तसेही नाही, स्टेरॉईड शरीराचे आतल्या आत बरेच नुकसान करत असते. त्यातच शरीर कमकुवत झाल्यास स्टेरॉईडचे दुष्परिणाम समोर येऊ लागतात.

त्यामुळेच स्टेरॉईड किंवा सप्लिमेंटला हात न लावता व्यायाम करा, व्यायामानंतर नैसर्गिक आहारच घ्या. जितके तुम्ही नैसर्गिक राहाल तेवढीच तुमची तब्येत आणि शरीरही खरे, नैसर्गिक असेल, असे तळवळकर म्हणाले.



व्यवसाय विस्तार

'तळवळकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लि.' ने 'यूएस'मधील 'स्नॅप फिटनेस' करार केला आहे. या करारानुसार 'तळवळकर्स' सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, थायलंड, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये व्यवसायविस्तार करणार आहे.

सद्यस्थितीत भारत आणि श्रीलंकेत 'तळवळकर्स'च्या जीम 85 शहरातील 211 ठिकाणी सुरू असून त्यात 2 लाख सदस्य आहेत.




हे देखील वाचा - 

लीना मोगरे यांचा फिटनेस मंत्र

हॉटेल विनयची 'विनम्रता', 'मेन्यूकार्ड' केले स्वस्त!


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा