Advertisement

रक्त घेताय? मग नॅट तपासणी कराच...


रक्त घेताय? मग नॅट तपासणी कराच...
SHARES

ज्या वेळेस तुम्हाला आपातकालीन परिस्थितीत रक्ताची गरज पडते त्यावेळेस तुम्ही फक्त रक्त कसं मिळेल याचा विचार करता? पण, तुम्ही कधी हा विचार केला आहे का की त्या रक्ताची योग्य तपासणी झाली आहे किंवा नाही ते? पण, तुम्ही हा नं केलेला विचार तुम्हाला खूप महाग पडू शकतो.

त्याचं कारणंही तसंच आहे...रक्तपेढ्यांमधील दूषित रक्त आणि रक्तघटकांच्या संक्रमणामुळे वर्षभरात मुंबईतील 18 जणांना एचआयव्हीची बाधा झाल्याची माहिती नुकतीच समोर आली. मुंबईतील एड्स नियंत्रण सोसायटीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2014 ते 2017 या तीन वर्षांत 78 जणांना रक्त आणि लाल रक्त पेशी, प्लेटलेट्स, प्लाझ्मा या रक्त घटकांच्या संक्रमणातून एचआयव्हीची बाधा झाली आहे. त्यापैकी फक्त 2016-17 या वर्षात 18 जणांना रक्तसंक्रमणातून एचआयव्हीची लागण झाली आहे.  

मुंबईत महापालिकेच्या किंवा सरकारी रुग्णालयातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ततपासणीसाठी ‘एलायझा’ ही पद्धत वापरली जाते. पण, या रक्त तपासणीत ‘एचआयव्ही’चे निदान तात्काळ होत नाही. शिवाय, या रक्ततपासणीत 30 दिवसांच्या (विंडो पीरिअड) कालावधीत एचआयव्हीचं निदान होतं. त्यामुळे, पुन्हा एकदा अग्रेसर अशा नॅट म्हणजेच ‘न्युक्लीक अॅसिड टेस्ट’ तपासणीची गरज असल्याचं समोर आलं आहे.


काय आहे न्युक्लीक अॅसिड टेस्ट?

नॅट म्हणजेच ‘न्युक्लीक अॅसिड टेस्ट’ ही एक अत्याधुनिक रक्ततपासणीसाठी वापरण्यात येणारी पद्धत आहे. ज्यामुळे रक्त तपासणीअंतर्गत एचआयव्हीचे निदान पहिल्या 10 दिवसांत होते. जर रक्तात एचआयव्हीचे तत्काळ निदान झालं, तर ते रक्त डिसकार्ड म्हणजेच कोणीही वापरु शकत नाही. ज्यामुळे रक्त संक्रमणातून एचआयव्ही होण्याचा प्रकार टाळता येतो.


महापालिका आणि सरकारी रक्तपेढींमध्ये का नाही ‘नॅट’ची सुविधा

भारतात नॅट ही तपासणी फक्त खासगी रुग्णालयांमध्येच केली जाते. कारण, ही तपासणी खर्चिक असल्याकारणाने सरकारी किंवा पालिकेच्या रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये ही केली जात नाही. या तपासणीसाठी प्रत्येक युनिट रक्तामागे 1200 रुपयांपर्यंत खर्च येतो. या तपासणीच्या मेन्टनंससाठी वर्षाला 40 कोटी एवढा खर्च येऊ शकतो.

सरकारी किंवा महापालिका रुग्णालयांतील रक्तपेढ्यांमध्ये गेल्या 2 वर्षांपासून ‘एलायझा 4जनरेशन’ ही पद्धत वापरली जाते. ‘नॅट’साठी आम्ही शासनाकडे निधीची मागणी केली आहे. निधीअभावीच ही पद्धत आपण वापरत नाही आहोत. पण, तसा प्रस्ताव आम्ही शासनाला पाठवला आहे. निधी प्राप्त झाला की सरकारी रुग्णालयांमधील रक्तपेढ्यांमध्ये ही पद्धत वापरली जाईल.

डॉ. सतीश पवार, संचालक, आरोग्य सेवा


शिवाय, नॅट पद्धतही पूर्णपणे 100 टक्के एचआयव्हीचं निदान देईलच असं नाही, त्यामुळे या पद्धतीची तेवढी गरज आपल्याकडे सध्या नाही, असं मत डॉ.पवार यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना मांडलं आहे. कारण, जवळपास वर्षाला महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांमधून 4 लाख युनिट रक्त जमा केलं जातं. त्यात रक्ताच्या संक्रमणातून एचआयव्ही होण्याचं प्रमाण कमी असल्याचंही डॉ. पवार यांनी स्पष्ट केलं आहे.  


आमच्याकडे रक्त तपासणीसाठी नॅट ही पद्धत वापरली जाते. ज्यामुळे रक्तातील एचआयव्हीचं खूप लवकर निदान होतं. 10 दिवसांत आम्ही निदान करतो. आणि ही खूप उपयुक्त अशी पद्धत आहे.  

ओम श्रीवास्तव, संचालक, संसर्गजन्य रोग विभाग, जसलोक रुग्णालय

गेल्या वर्षी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी नॅट तपासणीसाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं.







संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा