Advertisement

नाशिक ऑक्सिजन लिकेज : ठेकेदारानं निकृष्ट काम केल्याचा ठपका, २१ दिवसातच पाईप तुटला

काही दिवसांमध्येच पाईप तुटून ऑक्सिजन गळती झाल्यामुळे निकृष्ट साहित्य बसवले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

नाशिक ऑक्सिजन लिकेज : ठेकेदारानं निकृष्ट काम केल्याचा ठपका, २१ दिवसातच पाईप तुटला
SHARES

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाक्या बसवण्यापासून ते ऑक्सिजन पुरवण्यापर्यंत सर्व काम पुण्यातील टायो निप्पॉन सन्सो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे सोपावले होते. मात्र, या कंपनीनं काम सुरू करून फक्त २१ दिवस झाले होते. काही दिवसांमध्येच पाईप तुटून ऑक्सिजन गळती झाल्यामुळे निकृष्ट साहित्य बसवले गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी याच कंपनीची असताना जेव्हा घटना घडली तेव्हा जागेवर कंपनीचे अभियंता नसल्याचं समोर आलं आहे. पालिकेचे मुख्य अग्निशामक अधिकारी संजय बैरागी यांनी स्वत: रेड कॅपखालील मेन व्हॉल्व्ह बंद केल्याचं सांगितलं.

गेल्या वर्षी कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर डॉ. हुसेन रुग्णालयात १० केएल तसंच मविप्र वैद्यकीय महाविद्यालयात ३ केएल क्षमतेच्या दोन ऑक्सिजन टाक्या बसवण्याचा निर्णय झाला.

विद्यमान विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे पालिकेचे आयुक्त असताना प्रक्रिया सुरू झाली. पालिकेचे सध्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी ठेकेदार निश्चितीची प्रक्रिया अंतिम केली.

टाक्या बसवण्यास विलंब होत असल्यामुळे स्थायी समितीत सदस्यांनी टीकाही केली होती. तसंच स्थायी समितीनं लाखो रुपये भाड्यावर देण्याऐवजी स्वमालकीच्या टाक्या घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासनानं त्याची अंमलबजावणी न करता संबंधित कंपनीला मक्ता देण्यात आला.

स्थायी समितीकडून काम झाल्यानंतर मंजुरी घेतली गेली. मुळात, महिनाभरापूर्वी टँकचे काम सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच बिघाड होण्याची बाब संशयास्पद आहे. त्यामुळे मक्तेदार तसंच या कामाकडे दुर्लक्ष करणारे अतिरिक्त ऑयुक्त, वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करणं गरजेचं असल्याचं मत स्थायी समितिकडून व्यक्त केले जात आहे.



हेही वाचा

कारखान्यांच्या ठिकाणीच उभारणार हाॅस्पीटल्स, आॅक्सिजन तुटवड्यावर सरकारची नवी शक्कल

‘त्यांचे’ अश्रू कसे पुसू?, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा