फार्मासिस्टच्या नोंदणीसाठी आता राष्ट्रीय स्तरावर परीक्षा

 Mumbai
फार्मासिस्टच्या नोंदणीसाठी आता राष्ट्रीय स्तरावर परीक्षा
Mumbai  -  

 मुंबईसह देशभर फार्मासिस्टचे बोगस सर्टिफिकेट देणाऱ्या दलालांचा सुळसुळाट झाल्यामुळेच मुंबईसह देशभर बोगस फार्मासिस्टचाही सुळसुळाट वाढला आहे. त्यातूनच या दलालांना आणि मुख्यत्वे बोगस फार्मासिस्टना आळा घालण्याचे आव्हान फार्मसी काऊंन्सिल ऑफ इंडियासमोर उभे ठाकले आहे. हे आव्हान पेलण्यासाठी पीसीआयने फार्मासिस्टच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय स्तरावर परिक्षा बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र फार्मसी काऊन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील यांनी मुंबई लाईव्हला दिली आहे.

महाराष्ट्रात फार्मासिस्ट म्हणून काम करण्यासाठी महाराष्ट्र फार्मसी काऊन्सिलकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीधारकच फार्मासिस्ट म्हणून काम अथवा  इतर प्रकारची फार्मासी क्षेत्रातील नोकरी करू शकतो. तर इतर राज्यात फार्मासिस्ट म्हणून काम करण्यासाठीही त्या त्या राज्यात नोंदणी करावी लागते. मात्र गेल्या काही वर्षात बोगस सर्टिफिकेटद्वारे काऊन्सिलकडे नोंदणी केली जात असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यानुसार अनेकांवर गुन्हे दाखल करत खटलेही भरण्यात आले आहेत. 

छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील बोगस फार्मासिस्टचे सर्टिफिकेट दाखवत नोंदणी करतात. असे प्रकार उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र फार्मसी काऊन्सिलने नोंदणीसाठी परीक्षा बंधनकारक केली होती. मात्र याला विरोध झाल्याने ही परीक्षा बंद करावी लागली होती.


या निर्णयामुळे बोगस फार्मासिस्टना आळा बसेल आणि बोगस फार्मासिस्टच्या माध्यमातून रुग्णांच्या जिवाशी सुरू असलेला खेळ थांबेल -कैलास तांदळे, अध्यक्ष- महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशन 

आता मात्र पीसीआयनेच बोगस फार्मासिस्टना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर नोंदणीसाठी परीक्षा बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या पीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. या निर्णयाचे जोरदार स्वागतही त्यांनी केले आहे. महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशननेही या निर्णयाचे स्वागत केले आहे

Loading Comments