Advertisement

धर्मादाय आयुक्तांनी केलं स्टिंग ऑपरेशन, नानावटी रुग्णालयाविरुद्ध गुन्हा दाखल होणार


धर्मादाय आयुक्तांनी केलं स्टिंग ऑपरेशन, नानावटी रुग्णालयाविरुद्ध गुन्हा दाखल होणार
SHARES

काही दिवसांपूर्वी मुंबईतील नानावटी रुग्णालयाचं धर्मादाय आयुक्त शि. ग. डिगे यांनी स्टिंग ऑपरेशन केलं होतं. त्यावेळी रुग्णालयाला अचानक दिलेल्या भेटीत रुग्णालयाचा खरा चेहरा समोर आला होता. या स्टिंगमध्ये रुग्णालयात गरीब रुग्णांवरील उपचाराची योजना राबवण्यासंदर्भात आढळलेल्या त्रुटींबद्दल रुग्णालयाच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत.

धर्मादाय आयुक्तांनी रुग्णालयाला अचानक भेट दिली. त्यावेळी, तेथे गरीब रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भातील योजनेची माहिती आणि उपचार यामध्ये त्रुटी आढळून आल्या. या प्रकरणी चौकशी करून आणि रुग्णालयाची बाजू ऐकून डिगे यांनी रुग्णालयाच्या विश्वस्तांविरुद्ध महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 66 ख नुसार गुन्हा दाखल करण्यास सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना परवानगी दिली आहे.

नानावटी रुग्णालयामध्ये एक सामान्य रुग्ण म्हणून मी भेट दिली. त्यावेळी गरीब रुग्णांवरील उपचारांच्या व्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामध्ये या योजनेसंदर्भातील फलक दर्शनी भागात लावण्यात आले नव्हते. तसेच, या योजनेनुसार निर्धन रुग्णांसाठी 33 आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी 33 अशा खाटा राखीव असणं अपेक्षित होतं. या भेटीदरम्यान या खाटांवर इतर रुग्ण आढळून आले आणि केवळ 12 रुग्ण आरक्षित खाटांवर उपचार घेत असल्याचं दिसून आलं.

शि. ग. डिगे, धर्मादाय आयुक्त


यासंदर्भात रुग्णालयाने बाजू मांडली आहे. मात्र, या रुग्णालयामध्ये योग्य पद्धतीने गरिबांवर उपचार होत नाहीत, असं एकंदरीत निरीक्षण आयुक्तांनी या आदेशात मांडलं आहे. तसंच, आढळलेल्या त्रुटी या मे 2017 मध्ये करण्यात आलेल्या तपासणीमधील त्रुटींसारख्याच असून, त्यामध्ये कुठलाही बदल आढळून आला नाही,  असंही यामध्ये म्हटलं आहे.



हेही वाचा

केईएममध्ये पाण्यात उभं राहून डॉक्टरांनी केले उपचार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा