मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात परळच्या केईएम आणि मुंबई सेंट्रल येथील नायर या दोन्ही रुग्णालयांमध्ये पाणी साचलं होतं. पण अंदाजे गुडघ्याएवढ्या पाण्यात उभं राहून डॉक्टर आमच्यावर उपचार करतच राहिले. आमची जराही गैरसोय होऊ दिली नाही, अशी प्रतिक्रीया केईएम रुग्णालयातील रुग्णांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.
मुंबईत २९ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालं. केईएम सारख्या मोठ्या रुग्णालयातही पावसाचं पाणी भरलं. केईएमच्या तळमजल्यावर पावसाचं पाणी साचलं. त्यामुळे तळमजल्यावरील रुग्णांना पहिल्या मजल्यावरील वॉर्डमध्ये हलवण्यात आलं.
सकाळी ड्युटीवर आलेले डॉक्टर, कर्मचारी पावसामुळे घरी परतलेच नाही. दिवसभर काम करुन पुन्हा संध्याकाळी त्यांनाच रुग्णांवर उपचार करावे लागले. कमी कर्मचारी असूनही आम्हाला तत्काळ पहिल्या मजल्यावर हलवण्याची व्यवस्था डॉक्टरांनी केली. आम्हाला अजिबात त्रास होऊ दिला नाही, अशी प्रतिक्रिया केईएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्रद्धा सावंत यांनी दिली.
माझ्या पत्नीला निमोनिया आणि किडनीचा त्रास आहे. २८ ऑगस्टला आम्ही तिला केईएममध्ये घेऊन आलो आणि दुसऱ्या दिवशी पाऊस पडला. पण, डॉक्टरांनी पत्नीच्या उपचारांमध्ये कसलीही कमी पडू दिली नाही. तळमजल्यावर पाणी भरताच तिला पहिल्या मजल्यावर हलवलं. जी सुविधा तळमजल्यावर दिली जात होती तशीच वर देखील मिळाली.
- जगदीश सावंत, श्रद्धा सावंत यांचे पती
माझ्या सासूबाईंना हृदयाचा आणि अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे केईएममध्ये मागील १५ दिवसांपासून उपचार सुरू आहेत. आमच्या वॉर्डमध्ये पाणी साचलं नव्हतं. पण, खूप गोंधळ होता. पण, डॉक्टरांनी वेळच्या वेळी तपासणीपासून औषध देण्यापर्यंत सर्व गोष्टी स्वत: केल्या.
- उमा सुनील भास्करन, रुग्णाचे नातेवाईक
हे देखील वाचा -
...यामुळे केईएममधील एक्स-रे मशीन पडली बंद
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)