Advertisement

केईएम रुग्णालयात तुंबले पावसाचं पाणी


केईएम रुग्णालयात तुंबले पावसाचं पाणी
SHARES

मुंबईत सतत चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलसह महापालिकेच्या रुग्णालयालाही बसला. परळच्या केईएम रुग्णालयातील तळ मजल्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तुंबले. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांना त्याच पाण्यातून वाट काढत जावे लागले. शिवाय, रुग्णालयातील वॉर्ड नंबर 4 मध्येही पावसाचे पाणी तुंबले. त्यामुळे तिथल्या रुग्णांना महिलांच्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे. रुग्णांसह रुग्णालय प्रशासनाला पावसामुळे मनस्ताप सहन करावा लागला.

रुग्णालयात पाणी साचले होते. आता ते काढण्याचे काम सुरू होते. आता बऱ्यापैकी पाणी कमी झाले. पण जर पाऊस असा सतत पडत राहिला तर आम्ही पुढील दक्षता घेऊ. वॉर्ड चार मध्ये पाणी साचल्याकारणाने तिथल्या रुग्णांना आम्ही महिलांच्या वॉर्डमध्ये शिफ्ट केले आहे.

- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालयमुंबई शहरात 24 तासांत 152 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शिवाय पुढील 24 तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


जोरदार पावसामुळे लालबाग, हिंदमाता, परळ भागात पाणी साचले. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, वांद्रे, दादर भागात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. रस्ते, रेल्वे वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर लाईनला जोडणारा दादर स्टेशनच्या ट्रॅकवरही पाणी साचले आहे. त्यामुळे दादरहून जाणारी वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. पावसामुळे अनेक कार्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या सर्व शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


हेही वाचा - 

बोरिवली-माटुंगा प्रवास 130 मिनिटांचा

पावसामुळे हार्बर, मध्य रेल्वे वाहतूक ठप्प, हायटाईडचा इशारासंबंधित विषय
Advertisement