आशियातील सर्वाधिक मोठी झोपडपट्टी असलेली धारावी झोपटपट्टी कोरोनाचं हॉटस्पॉट बनली आहे. धारावीत दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. धारावीतील कोरोनाबाधितांच्या संख्येनं १००० चा आकडा पार केला असून, महापालिकेनं आतापर्यंत तब्बल ३ लाख ६० हजार धारावीकरांची तपासणी केली आहे. त्याचप्रमाणं १ लाख ७५ हजार ज्येष्ठ नागरिकांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. काही दिवसांपासून महापालिकेनं धारावीतील रहिवाशांची व्यापक प्रमाणावर वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे. खासगी डॉक्टर आणि महापालिका कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या पथकांनी आतापर्यंत ४७ हजार ५०० नागरिकांची तपासणी केली आहे. धारावीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘फिवर कॅम्प’मध्ये ३ हजार २२४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. करोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत धारावीतील खासगी डॉक्टरही सहभागी झाले आहेत.
धारावीमध्ये तब्बल ३५० खासगी दवाखाने सुरू करण्यात आले असून गेल्या महिनाभरात तब्बल १ लाख ७५ हजार धारावीकरांची या दवाखान्यांमध्ये तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ३७९ जणांना विलगीकरणात ठेवण्याची आणि त्यांची कोरोना चाचणी करण्याची सूचना या डॉक्टरांकडून करण्यात आली आहे. त्यानुसार, या सर्वाना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
महापालिकेच्या दवाखान्यांमध्येही युद्धपातळीवर रुग्ण तपासणी सुरू असून आतापर्यंत तेथे ११ हजार जणांची तपासणी करण्यात आली असून दवाखान्यातील डॉक्टरांनी केलेल्या शिफारशीनुसार १७५ जणांची करोनाविषयक चाचणी करण्यात आली आहे. तसंच, विशेष तपासणी पथकांद्वारे आतापर्यंत धारावीमधील तब्बल एक लाख २१ हजार ५८१ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
हेही वाचा -
३ मेडिकल कॉलेजमधील ७३ डॉक्टरांना कोरोनाची लागण
सलग दुसऱ्या वर्षी नवी मुंबई ठरलं 'कचरामुक्त शहर'
