Advertisement

डॉक्टरांचा संप आणि रुग्णालयांमध्ये धरणीकंप


डॉक्टरांचा संप आणि रुग्णालयांमध्ये धरणीकंप
SHARES

परळ - रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना केलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे गेल्या एक आठवड्यापासून निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. जोपर्यंत सरकार डॉक्टरांच्या बाजूने योग्य निर्णय देत नाही तोपर्यंत हा संप असाच चालू राहणार असल्याची चिन्हे मंगळवारी केईएम रुग्णालयात पहायला मिळाली. मात्र डॉक्टरांच्या या आडकाठी संपामुळे गरीब गरजू रुग्णांना वेठीस धरले जात आहे.

'डॉक्टरांच्या संपामुळे बाह्यरुग्ण विभाग पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहील. फक्त अत्यावश्यक रुग्ण तपासणी चालू आहे. रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. आदेशावरून' अशा सूचनांचा फलक आजही केईएम रुग्णालयात लिहून ठेवण्यात आला आहे. पण लिहून ठेवलेल्या फलकाने रुग्ण बरा होईल का? खरंच हा फलक रुग्णांना वाचता येतोय का? या रुग्णालयात येणारे 95 टक्के रुग्ण ग्रामीण अथवा दारिद्रय रेषेखालील असल्यामुळे त्यांना याबाबत काहीही माहीत नाही. इथे आल्यावर ऐकलं, एका व्यक्तीने सांगितलं, एक व्यक्ती बोलत होता तेव्हा कळलं अशा प्रतिक्रिया या रुग्णांकडून व्यक्त होत होत्या. पण रुग्णालय कधी सुरू होणार? याची योग्य माहिती न मिळाल्याने रुग्णांमध्ये नाराजी होती. पण येथेच उपचार घ्यायचे असल्याने शांत राहिल्या शिवाय पर्याय नाही अशा भावना त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत होत्या. तर मंगळवारी ओपीडी असल्याने गरोदर महिला नियमित तपासणीसाठी आल्या होत्या. तर थयरॉइड रुग्णांची देखील गर्दी केईएम रुग्णालयात दिसत होती.

मुलाच्या किडनीला सूज आली असल्याने पुण्याहून पहाटेच येथे आलो आहे पण ओपीडी बंद असल्याने सकाळपासून ओपीडी सुरू होण्याची वाट बघत असल्याची प्रतिक्रिया पुण्याहून मुंबईत उपचारासाठी आलेले जगदीश भोसले यांनी दिली. तसंच उपस्थित असलेले डॉक्टर संपाचे कारण पुढे करत इथून तिथे जाण्यास सांगत आहेत. उपचार मिळाले नाही तर त्यांची प्रकृती खालावेल असंही भोसले म्हणाले.

आठवा महिना असल्याने मंगळवारी नियमित तपासणीची तारीख होती. त्यामुळे तपासणी आणि औषधे घेण्यासाठी सकाळपासून आले असून कुणीही काहीही सांगण्यास तयार नसल्याचे शिवडीत राहणाऱ्या गरोदर महिला प्रज्ञा कांबळी यांनी सांगितले. 

भाचा सुभाष खामकर याला कॅन्सर झाला आहे म्हणून थेट रत्नागिरीहुन सकाळी रुग्णालयात घेऊन आलो. पण इथे आल्यावर डॉक्टरांचा संप असल्याचे समजल्यामुळे काय करायचं, कुठे राहायचं? रुग्णालयात दाखलही करून घेतले जात नाही. कोणत्या रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टरांना मारायची हौस असेल? हे डॉक्टरच असे आहेत. त्यांना रुग्णांशी बोलायची पद्धत नाही. उर्मट, उद्धटपणे बोलतात त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ येते. प्रत्येक दोन तीन महिन्यांनी यांना सुरक्षा आणि संरक्षण हवे कशाला? येथे येणारे रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक गुंड नाहीत असा संताप नम्रता पवार यांनी व्यक्त केला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा