Advertisement

पोद्दार काॅलेज प्रकरण: 'भरलेलं शुल्क परत करू‘, पण विद्यार्थ्यांच्या राहण्याचं काय?


पोद्दार काॅलेज प्रकरण: 'भरलेलं शुल्क परत करू‘, पण विद्यार्थ्यांच्या राहण्याचं काय?
SHARES

वरळीच्या पोद्दार आयुर्वेदिक काॅलेजमधील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि निवासी डॉक्टरांनी आपल्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू ठेवलं. काॅलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांना अचानक वसतिगृह खाली करण्याचे आदेश दिल्याने सोमवारपासून डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. त्यावर विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क परत करू, पण वसतिगृह खाली करा, असं पोद्दार काॅलेजचे अधिष्ठाता डाॅ. गोविंद खटी यांनी सांगितल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.


प्रशासनाकडून दखल नाही

काॅलेज प्रशासनाकडून आमच्या आंदोलनाची कुठलीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार असल्याचं काॅलेजमधील निवासी डाॅक्टर आणि विद्यार्थ्यांनी सांगितलं. तर, प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांच्या काम बंद आंदोलनाचा रूग्णसेवेवर काहीच परिणाम झाला नसल्याचं पोद्दार काॅलेजचे अधिष्ठाता डाॅ. गोविंद खटी यांनी सांगितलं.



इतरही समस्या

केवळ वसतिगृहाचीच समस्या नसून विद्यार्थ्यांच्या इतरही समस्या आहेत. पण, त्याबाबत प्रशासन काहीच ऐकून घेण्याच्या तयारीत नाही. विशेषकरून शहराबाहेरुन आलेल्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाबाहेर सोडल्यावर जायचं कुठे? या प्रश्नाचं कुणाकडेच उत्तर नसल्याचं एका विद्यार्थ्यांने सांगितलं.


रूग्णसेवेवर परिणाम नाही

पोद्दार आयुर्वेदिक रूग्णालयात दररोज बाह्यरूग्ण तपासणी तसंच उपचारासाठी ७०० हून अधिक रूग्ण येतात. बाह्यरूग्ण कक्षातील रूग्णसंख्या मोठी असल्याने डाॅक्टर संपाचा रूग्णसेवेवर परिणाम झाल्याचं सांगण्यात येत होतं. पण, काम बंद आंदोलनात केवळ प्रशिक्षणार्थी डाॅक्टर सहभागी झाले असून इतर डाॅक्टरांची सेवा सुरूच असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.


वसतिगृहाच्या क्षमतेपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. अशावेळी कुठलीही दुर्घटना घडू शकते. किती विद्यार्थ्यांकडून वसतिगृहाचे शुल्क घेतले आहेत, याची प्रशासनाकडून तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार वाढीव विद्यार्थ्यांचे शुल्क परत करण्यास आम्ही तयार आहोत.
-डाॅ. गोविंद खटी, अधिष्ठाता, पोद्दार आयुर्वेदिक काॅलेज

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा