Advertisement

वाडियामध्ये तिसरी सयामी शस्त्रक्रिया यशस्वी

ही गोष्ट आहे लव आणि प्रिन्स या दोन चिमुकल्यांची. प्रसूती झाल्यानंतर आपल्याला जुळी मुलं झाली आहेत हे ऐकून शितल झलटे यांना प्रचंड आनंद झाला. पण ही सयामी मुलं असून ती एकमेकांना जोडलेली आहेत हे ऐकून मात्र त्यांना प्रचंड दु:ख झालं. शिवाय त्यांना प्रचंड चिंतेनं ग्रासलं. या मुलांचं पुढे होणार काय?

वाडियामध्ये तिसरी सयामी शस्त्रक्रिया यशस्वी
SHARES

जन्म झाल्यानंतरची ती दोघं आणि आजची ती दोघं, यांच्याच जमीन-अस्मानाचा फरक आहे. जन्मत:च त्यांना पाहून त्यांच्या आई-वडिलांच्या काळजाचा थरकाप उडाला होता. त्यांची परिस्थितीच तशी होती. पण आज त्यांच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद आहे. त्याला कारणही तसंच आहे!


एका क्षणात आनंद, दुसऱ्याच क्षणी दु:ख

ही गोष्ट आहे लव आणि प्रिन्स या दोन चिमुकल्यांची. प्रसूती झाल्यानंतर आपल्याला जुळी मुलं झाली आहेत हे ऐकून शितल झलटे यांना प्रचंड आनंद झाला. पण ही सयामी मुलं असून ती एकमेकांना जोडलेली आहेत हे ऐकून मात्र त्यांना प्रचंड दु:ख झालं. शिवाय त्यांना प्रचंड चिंतेनं ग्रासलं. या मुलांचं पुढे होणार काय?



वाडियाच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

शितल झलटे यांच्या मदतीला वाडिया रूग्णालय आणि तेथील डॉक्टर धावून आले. प्रसूती झाल्यानंतर त्यांनी आधी शितल झलटेंना धीर दिला. आणि या सयामी मुलांवर उपचार करण्याची तयारी दर्शवली. आणि तिथून लव आणि प्रिन्सचा उपचारप्रवास सुरू झाला.

ही आमची दुसरी शस्त्रक्रिया आहे. त्यांच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणेच हे दोघं आता मूत्रविसर्जन आणि मलविसर्जन करु शकतील. मात्र, त्यांना भविष्यात कमरेखालील अवयवांच्या व्यायामाची गरज आहे. त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

डॉ. प्रज्ञा बेंद्रे, वाडिया


दोघांना वेगळं करण्याचं होतं आव्हान

लव आणि प्रिन्स ही दोन्ही मुलं जन्मजात एकमेकांशी जोडली होती. त्यांचं पोट आणि नितंब एकमेकांत गुंतलेलं होतं. या दोघांमध्ये यकृत, आतडे आणि मूत्राशय हे तीन अवयव एकच होते. वैद्यकीय भाषेत अशा परिस्थितीत असणाऱ्या मुलांना झिफीओ आयशिओपॅगस, टेट्रापस असं म्हणतात. प्रिन्स आणि लव हे १२ डिसेंबर २०१७ ला वाडिया रुग्णालयात दाखल झाले. आवश्यक त्या सर्व चाचण्या केल्यानंतर वाडियाच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. तब्बल १२ तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर या दोघांना वेगळं करण्यात डॉक्टरांना यश आलं. वाडिया हॉस्पिटलच्या १२ डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली.



महिन्याभरानंतर समाधान!

शस्त्रक्रियेनंतरही लव आणि प्रिन्सला निगराणीखाली ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार केले जात होते. अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं. शस्त्रक्रियेच्या महिन्याभरानंतर आता लव आणि प्रिन्स कोणत्याही सपोर्टशिवाय चालू शकत आहेत. हे डॉक्टरांच्या प्रयत्नांचं मोठं यश म्हणावं लागेल.

सुरुवातीला खूप भीती वाटली. मात्र, डाॅक्टरांनी धीर दिला, विश्वासात घेतलं आणि ही शस्त्रक्रिया केली. माझी प्रसूतीही याच हॉस्पिटलमध्ये झाली. तेव्हापासून डॉक्टरांनी आम्हाला सपोर्ट केला. आमचा आनंद आम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

शितल झलटे, लव-प्रिन्सची आई

प्रसूतीच्या आधी केलेल्या रिपोर्टमध्ये हे एकमेकांशी जोडले असल्याचं विक्रोळीतील डॉ. विनोद प्रभू यांनी सांगितलंच नसल्याची तक्रार शितल झलटे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केली आहे.


वाडिया हॉस्पिटलमधली तिसरी शस्त्रक्रिया

वाडिया रुग्णालयाने १९९३ साली पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर २०१४ मध्ये रिद्धी आणि सिद्धी या दोन जुळ्या बहिणींवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. आणि आता ही तिसरी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा