Advertisement

रुग्णालयातील किती खाटा रिक्त? रोज माहिती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

किती खाटांवरील रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि किती खाटा रिक्त आहेत? याची यादी खाटांच्या क्रमांकासह दररोज रुग्णालयाच्या दरवाजावर लावण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व खासगी रुग्णालयांना दिले आहेत.

रुग्णालयातील किती खाटा रिक्त? रोज माहिती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
SHARES

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेतल्या आहेत. यापैकी किती खाटांवरील रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि किती खाटा रिक्त आहेत? याची यादी खाटांच्या क्रमांकासह दररोज रुग्णालयाच्या दरवाजावर लावण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व खासगी रुग्णालयांना दिले आहेत.

मुंबई महापालिका तसंच खासगी रुग्णालयांच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी नेमण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई महापालिकेत विशेष नियुक्त असलेल्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आदी यावेळी सहभागी झाले होते.

रिक्त खाटा उपलब्ध

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, कोरोना प्रादुर्भावाच्या सुरूवातीच्या काळात मुंबईमध्ये खाटांच्या उपलब्धतेबाबत तक्रारी येत होत्या. या तक्रारींचं प्रमाण बऱ्याच अंशी कमी झालं आहे. महापालिकेने मुंबईतील ३५ मोठ्या खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा ताब्यात घेतल्या आहेत. शिवाय काही अधिकाऱ्यांना महापालिकेच्या रुग्णालयांची जबाबदारी सोपविल्याने कामकाजात सुसूत्रता आली आहे. रुग्णांना खाटा देखील मिळत आहेत.  

ज्या खासगी रुग्णालयांती खाटा ताब्यात घेण्यात आल्या आहेत, त्या रुग्णालयांनी किती खाटांवरील रुग्णांवर उपचार सुरू आहे आणि किती खाटा रिक्त आहेत. याची यादी खाटांच्या क्रमांकासह दररोज रुग्णालयाच्या दरवाजावर लावण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.  

हेही वाचा - एका क्लिकवर मिळणार आयसीयू खाटा, व्हेंटिलेटरची माहिती

रुग्णवाहिकांचं नियंत्रण

मुंबईत मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका आहेत. काही खासगी संस्थांनी देखील रुग्णवाहिका भेट दिल्या आहेत. त्यांचं नियंत्रण करणारी यंत्रणा तयार करावी. जेणेकरून त्या माध्यमातून नागरिकांना सेवा मिळू शकेल. रुग्णवाहिकांना देखील मार्गदर्शन करावं म्हणजे कुठल्या रुग्णालयात खाटा रिक्त आहेत, याची त्यांना माहिती मिळू शकेल. 

जंबो सुविधा

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणारा जीवनावश्यक औषधांचा साठा महापालिकडे असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. शासनाने जंबो सुविधा निर्माण केल्या आहेत. देशात मोकळ्या मैदानावर रुग्णालये उभारण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर आहे. या अशा सुविधा निर्माण झाल्याने रुग्णांची खाटांसाठी होणारी गैरसोय टळली आहे. रुग्णांमध्ये विश्वास निर्माण झाल्यास मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचा ओढा कमी होईल आणि रुग्णालयांवरचा ताण देखील कमी होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.   

मुंबईतील जी छोटी खासगी रुग्णालये आहेत तिथं नॉन कोविड रुग्णांना सेवा मिळेल यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. उभारलेल्या सुविधा विनावापर पडून राहता कामा नये. कोरोनाविरुद्ध लढाई आता अंतिम टप्प्यात आली असं समजून ती जिंकण्यासाठी पावले उचलावित. मुंबई कोरोनामुक्त होईल, असं लक्ष्य ठेवावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

हेही वाचा - ठाणे महापालिकेची ‘ऑनलाइन बेड अलोकेशन सेवा’

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा