Advertisement

हिंदुजा, जसलोक, बॉम्बे, लीलावती रुग्णालयांना आरोग्य खात्याची नोटीस

सरकारच्या आदेशाचं पालन खासगी रुग्णालयांकडून होत नाही. सोमवारी रात्री आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या रुग्णालयांना अचानक भेट दिली.

हिंदुजा, जसलोक, बॉम्बे, लीलावती रुग्णालयांना आरोग्य खात्याची नोटीस
SHARES
मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता भासत आहे. कोरोना रूग्णांसाठी पुरेशा खाटा उपलब्ध व्हाव्यात म्हणून मुंबईतील खासगी रुग्णालयांतील 80 टक्के खाटा उपलब्ध करुन देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, काही मोठी रुग्णालये खाटा रिकाम्या असतानाही गरजूंना उपलब्ध करून देत नसल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे मुंबईतील हिंदुजा, जसलोक, बॉम्बे आणि लीलावती रुग्णालयांना राज्याच्या आरोग्य विभागाने नोटीस बजावली आहे. या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

रुग्णालयांनी रुग्णांना बेड्स उपलब्ध करुन दिले नाही, तर कायदेशीर कारवाई करु, असा इशाराही राजेश टोपे यांनी दिला आहे. कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथ रोग नियंत्रण कायद्याखाली खासगी रुग्णालयांना 80 टक्के खाटा ठरवलेल्या दरात आणि गरीबांसाठी 10 टक्के खाटा उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे.  मात्र सरकारच्या आदेशाचं पालन खासगी रुग्णालयांकडून होत नाही. सोमवारी रात्री आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या रुग्णालयांना अचानक भेट दिली.  मंगळवारी पहाटे दोन वाजेपर्यंत आरोग्यमंत्री रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत होते. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालये चार्जेसचे चार्टही लावत नसल्याचं समोर आले आहे. त्यानंतर राज्य सरकारने या रुग्णालयांवर कारवाई केली आहे.

राजेश टोपे म्हणाले की, मुंबईतील गरजू आणि गरीब रुग्णांना रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध झाले पाहिजेत. रुग्णालयांनी चार्जेसचा चार्ट लावला पाहिजे. रुग्णालयांना नोटीस पाठवून गरजूंना बेड्स मिळतात की नाही, आदेशांचं पालन होत आहे की नाही याची खात्री करून घेत आहे. या रुग्णालयामध्ये रुग्णांना बेड उपलब्ध असतील तर ते मिळालेच पाहिजेत. मी आरोग्यमंत्री या नात्याने स्वत: रुग्णालयांना भेट दिली आणि हे सहन केलं जाणार नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. 



हेही वाचा -

रेल्वे प्रवासी पासचा कालावधी वाढवून देण्याची प्रवासी संघटनेची मागणी

मुंबईच्या दिशेनं चक्रिवादळ, काय कराल आणि काय नाही?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा