Advertisement

अशा डॉक्टरांना घरीच बसवा!

फक्त अटक किंवा कारवाई करुन अशा डॉक्टरांना अद्दल घडणार नाही, त्यांचं लायसन रद्द करुन त्यांना कायमस्वरुपी घरी बसवलं पाहिजे, असं मत काही तज्ज्ञ डॉक्टरांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना व्यक्त केलं आहे. शिवाय, जर रुग्णालय प्रशासन, नातेवाईक किंवा एखाद्या संघटनेने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली, तर अशा डॉक्टरांवर कारवाई करुन लायसन्सही रद्द केलं जाऊ शकतं.

अशा डॉक्टरांना घरीच बसवा!
SHARES

पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जादूटोण्याचा वापर करुन करण्यात आलेल्या उपचारांमुळे वैद्यकीय क्षेत्राच्या विश्वासार्हतेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पुण्यातील अंधश्रद्धेविरुद्ध काम करणाऱ्या संघटनांनी हा प्रकार उघडकीस आणला. त्यानुसार, या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजूनही डॉक्टर आणि जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकाला अटक करण्यात आलेली नाही. 

मात्र, फक्त अटक किंवा कारवाई करुन अशा डॉक्टरांना अद्दल घडणार नाही, त्यांचं लायसन रद्द करुन त्यांना कायमस्वरुपी घरी बसवलं पाहिजे, असं मत काही तज्ज्ञ डॉक्टरांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना व्यक्त केलं आहे. शिवाय, जर रुग्णालय प्रशासन, नातेवाईक किंवा एखाद्या संघटनेने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली, तर अशा डॉक्टरांवर कारवाई करुन लायसन्सही रद्द केलं जाऊ शकतं, असं वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक प्रविण शिंगारे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना स्पष्ट केलं आहे.


एमसीआयच्या नियमांनुसारच व्हावेत उपचार

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कायद्यानुसार, डॉक्टरांनी फक्त नियमात बसणारेच म्हणजेच वैद्यकीय दृष्टीकोनातून रुग्णांवर उपचार करावेत. नियमबाह्य जाऊन एखाद्या डॉक्टरने उपचार केले तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. पण, त्यासाठीही रुग्णालय प्रशासनाने आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी तशी तक्रार शासनाकडे किंवा एमसीआयकडे केली पाहिजे, असंही प्रविण शिंगारे यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय, अनेकदा भावनेतून रुग्णाचे नातेवाईक रुग्ण बरा होणार नाही, असं समजल्यावर शेवटचा उपाय म्हणून देवाची प्रार्थना करतात, त्यातून हे मांत्रिकांचे, जादूटोण्याचे प्रकार घडतात. पण, रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये हा प्रकार घडणं अयोग्य आहे. त्यामुळे अशा डॉक्टरवर कारवाई झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया डॉ. शिंगारे यांनी दिली.


नेमकं काय घडलं मंगेशकर हॉस्पिटलमध्ये?

रुग्णालयात एखादी व्यक्ती उपचार घेत असेल किंवा आयसीयूमध्ये असेल, तर त्या व्यक्तीला भेटण्यासाठी नातेवाईकांना डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागते. पण, याच आयसीयूमध्ये चक्क मांत्रिक घुसतो आणि महिलेच्या अंगावरुन अगरबत्त्या फिरवतो. नेमका काय प्रकार आहे तुम्ही विचार करत असाल. पुण्याच्या प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात असाच प्रकार घडला आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आयुसीयूमध्ये उपचार सुरू असलेल्या महिलेच्या अंगावरुन उतारा काढण्यासाठी डॉक्टरनेच एका मांत्रिकाला बोलावलं होतं. तिच्या छातीत दुधाची गाठ झाल्याचा अहवाल आला होता. पण, ऑपरेशन केल्यानंतर तिची प्रकृती खालावली. त्यामुळे डॉ. सतीश चव्हाण यांनी एका मांत्रिकाला बोलावून मंत्रतंत्राचा वापर केला. तो मांत्रिक त्या महिलेच्या अंगावरुन अगरबत्ती फिरवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. योग्य उपचारांऐवजी २४ वर्षांच्या संध्या सोनावणे या महिलेवर मंत्र-तंत्राचा वापर करण्यात आला. इतकंच नाही, तर सात ते आठ ही धोक्याची वेळ असल्यामुळे दहा ते अकरा या वेळेत शस्त्रक्रिया करण्याचंही डॉ. चव्हाणांनी सुचवल्याचं संध्याच्या भावाकडून कळलं. पण, एवढं सर्व करुनही अखेर संध्या सोनवणे यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला.


विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह - डॉ. अभिजित मोरे

पुण्यात घडलेला हा सर्व प्रकार अतिशय निंदनीय असून त्यामुळे वैद्यकीय व्यवसायाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. त्यामुळे वैद्यकीय दृष्टीकोन ठेऊनच डॉक्टरांनी रुग्णावर उपचार केले पाहिजेत, असं मत जन आरोग्य चळवळ संघटनेचे डॉ. अभिजीत मोरे यांनी व्यक्त केलं आहे.


डॉक्टरांचा वैद्यकीय क्षेत्रावरचा विश्वास उडाला - कृष्ण जयगुडे

डॉक्टरांना आता त्यांच्या कामावर आणि वैद्यकीय दृष्टीकोनावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे आता ते तंत्र-मंत्र, जादूटोणा, लिंबू-मिरचीचा वापर करत असतील, असं मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा जयगुडे यांनी मांडलं आहे.


वैद्यकीय सृष्टीसोबत दृष्टीही स्विकारली पाहिजे - पुरूषोत्तम आवारे

उच्च दर्जाचे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रासोबत जुळवून तर घेतलं. पण, वैद्यकीय दृष्टी स्विकारली नाही. सर्वात जास्त एम डी, एम.बी.बी.एस झालेले डॉक्टरच तंत्र-मंत्राचा वापर करतात. आत्म्याचे खेळ, वास्तूशास्त्र, लॉकेट्स, गंडे, धागेदोरे अशा सर्व प्रकारांचा वापर केला जातो. त्यामुळे हे उच्चशिक्षित पॉश अंधश्रद्धेचा वापर करुन लोकांना फसवतात. ज्यांच्याविरोधात कारवाई झालीच पाहिजे, असं मत अखिल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य पुरुषोत्तम आवारे यांनी व्यक्त केलं आहे.


रुग्णाचे नातेवाईकही जबाबदार

एखाद्या घटनेला जेवढे डॉक्टर्स जबाबदार आहेत, तेवढीच रुग्णांच्या नातेवाईकांची मानसिकताही जबाबदार आहे. लोकं आजही जुन्या पिढी, परंपरा आणि अंधश्रद्धेखाली वावरत आहेत. त्यांनी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. तेव्हाच अशा घटनांना आळा बसण्यासाठी मदत होईल, असं मानसोपचातज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितलं.

माणूस गेला चंद्रावर आणि तू अजून अंधश्रद्धेत अडकला आहेस, असं अनेकदा आपण सहज बोलून जातो. पण, विज्ञानाने जरी किती प्रगती केली, तरी त्याला अंधश्रद्धेची जोड देणारेही उच्चशिक्षितच आहेत. जेवढं शिक्षण जास्त तेवढीच अंधश्रद्धा बळावतेय आणि त्यात आपण दिवसेंदिवस गुंतत चाललो आहोत, हे सत्य आपण सर्वांनीच स्वीकारलं पाहिजे.



हेही वाचा

बापरे! महिलेच्या योनीमार्गातून काढल्या २३ गाठी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा