Advertisement

लेनॉक्स-गेस्टॉट सिण्ड्रोम झालेल्या मुलावर वाडिया रूग्णालयात यशस्वी उपचार

अवघ्या सहा महिन्याचा असताना कृष्णाला वेस्ट सिण्ड्रोम हा मेंदूचा आजार झाला. त्याचं हळूहळू रुपांतर लेनॉक्स गेस्टॉट सिण्ड्रोममध्ये झाल्यानं त्याला सतत आकडी येत होती. सतत आकडी आल्यानं तो खूप अशक्त व कमकुवत झाला होता.

लेनॉक्स-गेस्टॉट सिण्ड्रोम झालेल्या मुलावर वाडिया रूग्णालयात यशस्वी उपचार
SHARES

परळमधील बाई जेरबाई वाडिया बाल रूग्णालयातील डॉक्टरांनी 'लेनॉक्स-गेस्टॉट सिण्ड्रोम' या क्वचित आढळणाऱ्या विकाराने ग्रस्त असलेल्या एका अकरा वर्षी मुलावर यशस्वी उपचार केले. कृष्णा किणी असं या मुलाचं नाव असून त्याच्यावर उपचार करण्यासाठी व्हेगल नर्व्ह स्टिम्युलेटर तंत्राचा वापर करण्यात आला. लेनॉक्स-गेस्टॉट सिण्ड्रोम हा तीव्र स्वरूपाचा आजार असून तो विशेषत लहान मुलांमध्ये आढळून येतो.


मेंदूचं कायमस्वरूपी नुकसान

कृष्णाच्या आरोग्याची स्थिती जन्मत: सामान्य होती. परंतु त्याच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यानं नवजात अर्भकावस्थेत त्याला अनेकदा आकडी आली. त्यामुळं त्याच्या मेंदूचं कायमस्वरूपी नुकसान झालं. अवघ्या सहा महिन्याचा असताना कृष्णाला वेस्ट सिण्ड्रोम हा मेंदूचा आजार झाला. त्याचं हळूहळू रुपांतर लेनॉक्स गेस्टॉट सिण्ड्रोममध्ये झाल्यानं त्याला सतत आकडी येत होती. सतत आकडी आल्यानं तो खूप अशक्त व कमकुवत झाला होता.

त्याला नीट चालताही येत नव्हते. तो अनेकदा पडायचा आणि त्यामुळं त्याला गंभीर दुखापत व्हायची. आपल्या मुलाची अशी स्थिती पाहून त्याचे आईवडील अगदी चिंताग्रस्त झाले होते. त्यांच्या दोघांचं आयुष्यच संपलं होतं. त्याच्या आईवडिलांनी बाहेर नातेवाईकांकडे जाणं आणि फिरणही टाळलं होतं. 


गुंतागुंतीची शस्त्रक्रिया

कृष्णाचा हा आजार बरा होण्यासाठी त्याला अनेक औषधे देण्यात आली होती. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर मेंदूच्या आजारासाठी चांगला समजला जाणाऱ्या किटोजेनिक आहार त्याला देण्यात आला. मात्र त्याचाही काही फायदा झाला नाही. त्यानंतर त्याच्यावर डिसेंबर २०१४ साली कॉर्पस कॅलोस्टोमी शस्त्रक्रिया झाली. या पॅलिएटिव्ह शस्त्रक्रियेत त्याच्या मेंदूच्या दोन भागांना जोडणारे तंतूमय घटक कापून मेंदूचे दोन भाग स्वतंत्र करण्यात आले. मात्र ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करूनही त्याची आकडी येणे थांबलं नाही.


अत्याधुनिक तंत्राद्वारे उपचार 

त्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला परळच्या वाडिया रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचं  निर्णय घेतला. वाडिया रूग्णालयात दाखल केल्यानंतर रूग्णालयातील कन्सल्टण्ट न्युरोलॉजिस्ट डॉ. शिल्पा कुलकर्णी यांनी डॉ. चंद्रशेखर देवपुजारी, डॉ. मिलिंद संखे, डॉ अनायता हेगडे या न्युरोलॉजिस्ट्सच्या पथकासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर कृष्णावर व्हेगल नर्व्ह स्टिम्युलेशन (व्हीएनएस) या अत्याधुनिक तंत्राद्वारे उपचार करण्याचं निर्णय घेतला. 


आकडीला प्रतिबंध

या तंत्रामुळं त्याच्या आकडीला प्रतिबंध करण्यास मदत झाली असून दिवसभर काही ठराविक काळानं व्हेगस मज्जातंतूंना सौम्य स्वरूपाचे ठोके पाठवले जातात. या ठोक्यामुळं मेंदूच्या भागांतील रक्तप्रवाह व चयापचय वाढवण्यास मदत होते. हे उपचार घेतल्यानंतर त्याच्या आकडीची तीव्रता व झटक्यांची संख्या २५० वरून ५-१० वर आली. विशेष म्हणजे यामुळं कृष्णाचं मानसिक आरोग्य, मूड आणि वर्तनही सुधारण्यास मदत झाली आहे. 


कृष्णा हा फार गरीब असल्याने अशाप्रकारे अत्याधुनिक पद्धतीनं उपचार करण्याची त्याची आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळं वाडिया रूग्णालयातर्फे त्याला आवश्यक तो निधी पुरवण्यात आला.  कृष्णावर डॉक्टरांनी केलेल्या या प्रयत्नांना यश आल्यानं आम्ही सर्व खरचं खुप आनंदी आहोत. 

- डॉ. मिनी बोधनवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाडिया रूग्णालय





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा