Advertisement

सेंट जॉर्जेस रुग्णालयात होणार लिंगपरिवर्तन विभाग


सेंट जॉर्जेस रुग्णालयात होणार लिंगपरिवर्तन विभाग
SHARES

महिला पोलिस कॉन्स्टेबल ललिता साळवे हिच्यावर मुंबईतील सेंट जॉर्जेस रुग्णालयात लिंगपरिवर्तन शस्त्रक्रियेचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. या शस्त्रक्रियेमुळे ललिता आता ललितकुमार या नावानं पुरूष म्हणून आयुष्य जगत आहे. सेंट जॉर्जेस रुग्णालयातील ही पहिलीच शस्त्रक्रिया होती. शस्त्रक्रियेनंतर ७ ते ८ जणांनी लिंगपरिवर्तनासाठी सेंट जॉर्जेस रुग्णालयाला भेट दिली अाहे. यानंतर सेंट जॉर्जेस रुग्णालयात प्रथमच लिंगपरिवर्तन विभागाची स्थापना करणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मधुकर गायकवाड यांनी 'मुंबई लाईव्ह' ला दिली.


लिंगपरिवर्तनाची स्पेशल कमिटी

सेंट जॉर्जेस रुग्णालयातील लिंग परिवर्तनाची ही पहिलीच शस्त्रक्रिया होती.  यातून सामान्य नागरीक लिंगपरिवर्तनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत अाहेत.  ललितवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सेंट जॉर्जेस रुग्णालयाकडे ७ ते ८ जणांनी लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करण्याची इच्छा वर्तवली असल्याचे डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितलं.  अनेकांनी लिंगपरिवर्तनाची इच्छा व्यक्त केल्याने  सेंट जॉर्जेस रुग्णालयात 'जेंडर रिअसाइनमेन्ट सेक्शन' म्हणजे लिंग परिवर्तन विभागाची स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये अनुभवी डॉक्टरांची कमिटी असणार आहे. तर जनरल कन्सल्टिंग, प्लास्टिक सर्जन, स्त्रीरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ , समाजसेवा विभाग आणि अन्य विभागांची स्थापना होणार असल्याची माहिती डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिली.


यशस्वी शस्त्रक्रियेनंतर प्रतिसाद 

 पुण्यात राहणाऱ्या एका महिलेला आपल्या मुलीमध्ये काही विचित्र बदल होताना दिसत होते. तिचे वागणे आणि राहणीमान एका मुलासारखे अाहे. तिला मैत्रिणी नसून सगळे मित्रच आहेत. या अाणि अशा बऱ्याच गोष्टींमुळे आपली मुलगी नसून मुलगा आहे असं त्या महिलेला वाटत अाहे.  ललितच्या शस्त्रक्रियेनंतर आपण एकदा सेंट जॉर्जेस रुग्णालयात जाऊन आपल्या मुलीबद्दल डॉक्टरांशी संवाद साधावा असे या महिलेला वाटले. अाणि त्यांनी डॉ. गायकवाड यांची भेट घेतली.

 या महिलेने अापल्या मुलीसह ललितची भेट घेतली. ललितसोबत झालेल्या सकारात्मक गप्पांनी त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि अखेर त्या मुलीने लिंगपरिवर्तन करण्याची इच्छा व्यक्त केली.  याशिवाय पुण्यातील बी. जे. मेडिकल रुग्णालयातील काही रुग्णांनीही सेंट जॉर्जेस रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याची इच्छा वर्तवली आहे.

पोलीस दलातील 'पहिलीच' घटना

बीड जिल्ह्यातील माजलगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या ललिता साळवे यांना या शस्त्रक्रियेबद्दल पुरेशी माहिती नव्हती. पण ललितामधील हार्मोनल बदलांनंतर वैद्यकीय चाचणीत तिच्यामध्ये पुरुषी हार्मोन्स असल्याचे दिसून अाले. त्यानंतर ललिताला लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. ललिताचा ललित होण्याचा प्रवास तेव्हापासून सुरु झाला. शस्त्रक्रियेनंतर अाता ललित अाता ड्युटीवर परतला अाहे.



हेही वाचा -

आता खरा प्रवास सुरु- ललितकुमार साळवे


 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा