Advertisement

धक्कादायक! पुण्यानंतर मुंबईतही कोरोनाचे २ रुग्ण!!

मुंबईतील ४ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असून २ जणांचा चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याचं अर्थात दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं समजत आहे.

धक्कादायक! पुण्यानंतर मुंबईतही कोरोनाचे २ रुग्ण!!
SHARES

कोरोना व्हायरसचा (Coronavirus update) संसर्ग झालेल्या पुण्यातील 'त्या' कुटुंबासोबत विमानातून प्रवास केलेल्या मुंबईतील ६ प्रवाशांचा शोध घेऊन या सर्वांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं हाेतं. यापैकी ४ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले असून २ जणांचा चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याचं अर्थात दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं समजत आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून ७ वर गेला आहे. या २ जणांचे चाचणी अहवाल पुन्हा एकदा तपासणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. 

याआधी सकाळी महाराष्ट्रात कोरोनाचे (Coronavirus update) ५ रुग्ण आढळले असले, तरी मुंबईत अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असा खुलासा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सकाळी केला होता.

दुबईहून पुण्यात आलेल्या दाम्पत्याला सर्वात पहिल्यांदा कोरोनाची (Coronavirus update) लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. हे दाम्पत्य सहलीनिमित्त दुबईला गेले होते. त्यानंतर हे दाम्पत्य ज्या विमानाने दुबईहून मुंबईला उतरले त्या विमानातील सर्व महाराष्ट्रातील प्रवाशांचीही चाचणी करण्यात येत आहे. अशा ४० प्रवाशांशी संपर्क साधण्यात आला आहे. सोबतच ज्या टॅक्सीचालकाच्या गाडीत ते बसले होते, त्या टॅक्सी चालकाच्या संपर्कात आलेल्या ७ ते ८ जणांचीही चाचणी करण्यात आली आहे. 

यापैकी ६ जणांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात (kasturba hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर या ६ जणांचे चाचणी अहवाल वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. यापैकी चौघांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह, तर दोघांचे चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यामुळे मुंबईत पहिल्यांदाच कोरोनाची लागण झालेले २ रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाचं आव्हान जागतिक पातळीवरचं असून मुंबई महापालिकेतर्फे (bmc) सर्व ती खबरदारी घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय विमानतळातून देशाबाहेरून संशयीत प्रवासी येत असल्याने विमानतळ सील करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा