Advertisement

नव्या कोरोनाचा भारतात शिरकाव; ६ जणांना संसर्ग


नव्या कोरोनाचा भारतात शिरकाव; ६ जणांना संसर्ग
SHARES

कोरोनाच्या संसर्गाचा वेग कमी होत असतानाच ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोनानं डोकेदुखी वाढवली आहे. वेगानं पसरणाऱ्या कोरोनाच्या या नवीन प्रकारानेही जगभरात हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत १६ देशात पोहोचलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारानं आता भारतातही शिरकाव केला आहे.

देशात कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले ६ रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. या नव्या प्रकारच्या विषाणूला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमान थांबवली आहे. मात्र, तरीही नव्या कोरोनानं भारतात पाऊल ठेवलं आहे. २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून ३३ हजार नागरिक भारतात परतले.

या सर्व प्रवाशांचा शोध घेण्यात आला आणि चाचण्या करण्यात आल्या. यात ११४ प्रवासी करोना पॉझिटिव्ह आढळून आले. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे नमुने देशातील १० प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले होते. यात कोलकाता, भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीसीएफडी हैदराबाद, इन्स्टेम बंगळुरू, एनआयएमएचएएनएस बंगळुरू, आयजीआयबी दिल्ली आणि एनसीडीसी दिल्ली या प्रयोगशाळांमध्ये हे नमुने पाठवण्यात आले होते.

बंगळुरू येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यापैकी ३ रुग्णांमध्ये नवीन स्ट्रेन (नवीन प्रकार) आढळून आला आहे. तर हैदराबाद प्रयोगशाळेतील दोघांच्या शरीरात आणि पुण्यातील प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी एका नमुन्यात हा स्ट्रेन आढळला आहे. एकूण सहा रुग्णांच्या शरीरात करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे.

या सर्व रुग्णांना संबंधित राज्यांनी स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवलं आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर अन्य प्रवाशांची माहिती घेण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

काही महिन्यापूर्वी ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला होता. या प्रकाराचा प्रसाराचा वेग प्रचंड असल्याचं ब्रिटन सरकारनं म्हटलं होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. मात्र, करोनाचा हा प्रकार १६ देशात पोहोचला आहे. भारतातही नवीन स्ट्रेनचे रुग्ण आढळून आले असून, या यादीत भारताचाही समावेश झाला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा