Advertisement

बेवारस मृतदेहांची 'मरणयातना' सुरूच, २ वर्षांहून जास्त काळ महापालिका रुग्णालयात पडून

महापालिका आणि सरकारी रूग्णालयातील शवागृहात दोन-चार महिने नाही, तर तब्बल २ वर्षे बेवारस पडून असलेल्या मृतदेहाच्या 'देहाची' होत असलेली विटंबना सुरूच आहे.

बेवारस मृतदेहांची 'मरणयातना' सुरूच, २ वर्षांहून जास्त काळ महापालिका रुग्णालयात पडून
SHARES

इतकेच मला जाताना सरणांवर कळले होते,
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...
असंख्य यातना सहन करत आयुष्य कंठणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या मनातील भाव टिपत सुरेश भटांनी जगण्याचं हे ओझं शब्दरूपाने सर्वांसमोर मांडलं होतं. पण काहीजणांच्या बाबतीत जेव्हा मृत्यूनंतरही अघोरी यातनांचं सत्र थांबत नाही, तेव्हा ही परिस्थिती मांडण्यासाठी भटांच्या ओळीही अपुऱ्या ठरतात. हो हे खरं आहे... महापालिका आणि सरकारी रूग्णालयातील शवागृहात दोन-चार महिने नाही, तर तब्बल २ वर्षे बेवारस पडून असलेल्या मृत'देहाची' होत असलेली विटंबना आणखी कुठल्या शब्दांत मांडायची?

परळच्या केईएम रुग्णालयातील शवागृहात गेल्या ६ महिन्यांपासून पोस्टमार्टम केलेले २३ बेवारस मृतदेह पडून आहेत. मात्र या मृतदेहांची ओळख पटत नसल्यामुळे पोलिस आणि शवगृहात काम करणारे कर्मचारी हतबल झाले आहेत. संबंधित पोलिसांना वारंवार पत्रव्यवहार करुनही त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने महापालिका रुग्णालयात असणाऱ्या या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात असंख्य अडचणी येत आहेत.



अपुऱ्या जागेत कोंडी

केईएम रुग्णालयाच्या शवागृहात मृतदेह ठेवण्यासाठी ३६ कॅबिनेट्स आहेत. यापैकी बेवारस मृतदेहांनींच २३ जागा व्यापल्याने इतर मृतदेह ठेवायला अनेकदा जागाच अपुरी पडते. आपत्कालीन परिस्थितीत नाईलाजाने हे मृतदेह पोत्यांचा ढीग रचावा तशाप्रकारे ठेवावे लागतात. त्यामुळे इथल्या शवागृहात काम करणारे कर्मचारीच सोडा, पण हे एकमेकांवर रचलेले ढीग पाहून एखादा मृतदेह घ्यायला, त्यांची ओळख पटवण्यासाठी येणाऱ्या कुटुंबीयांच्या मनाची काय अवस्था होत असेल? याचा विचारच न केलेला बरा.



अंत्यसंस्कार व्हावेत म्हणून...

गेल्या ६ महिन्यांपासून २३ मृतदेह केईएम रुग्णालयाच्या शवागृहात पडून आहेत. याचा आम्हाला मोठ्या प्रमाणात त्रास होतो. दरदिवशी आम्ही इथं काम करत असतो. हे मृतदेह बर्फात असले तरी त्यामुळे आम्हाला इन्फेकशन होण्याची शक्यता असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार करून या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, यासाठी प्रयत्न केले. परंतु अद्याप हे मृतदेह इथेच पडून आहेत, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या शवगृहात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर 'मुंबई लाइव्ह' ला दिली.

रुग्णालयात दररोज ३ ते ५ रुग्णांचा मृत्यू होतो. त्यात पश्चिम द्रूतगती महामार्ग आणि रेल्वे अपघात, इतर अपघातात मृत्यूमुखी पडलेले, इतर रुग्णालयातून आणून ठेवलेले असे बरेच मृतदेह केईएममध्ये येतात. त्यात बेवारस मृतदेहांची ओळख पटली नाही की ते मृतदेह अनेक महिनोंमहिने इथल्या शवागृहात पडून राहतात. त्याचा परिणाम आपत्कालीन परिस्थितीत होतो. अनेकदा शवागृहाच्या क्षमतेपेक्षा अधिक मृतदेह शवागृहात ठेवले जातात. त्याचा त्रास डॉक्टरांना आणि परिणामी कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो.



सायनमध्येही हीच तऱ्हा

हीच तऱ्हा आहे सायन रुग्णालयाची. मध्य मुंबईतील सर्वात महत्त्वाचं रुग्णालय असल्याने सायन रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्याही सर्वाधिक आहे. त्यातील गंभीर रुग्ण गतप्राण झाल्यास, मृतदेह ठेवण्यासाठी सायन रुग्णालयातील शवागृहातही जागेची कमतरता भासते कारण इथल्या शवागृहात ५६ कॅबिनेट्स असली, तरी बेवारस मृतदेहांचा आकडा ५६ एवढा आहे.


बेवारस मृतदेहांची संख्या

  • केईएम रुग्णालय- २३ बेवारस मृतदेह
  • सायन रुग्णालय- ५६ बेवारस मृतदेह
  • शताब्दी रुग्णालय- २० बेवारस मृतदेह



शवागृहातील कॅबिनेटची क्षमता

  • केईएम रुग्णालय- ३६ कॅबिनेट
  • सायन रुग्णालय- ५७ कॅबिनेट
  • जे.जे. रुग्णालय- ७५ कॅबिनेट
  • कूपर रुग्णालय- २४ कॅबिनेट
  • शताब्दी रुग्णालय- ३० कॅबिनेट
  • राजावाडी रुग्णालय- १५ कॅबिनेट


शताब्दीत २ वर्षांपासून २० बेवारस मृतदेह पडून

कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात गेल्या २ वर्षांपासून २० बेवारस मृतदेह पडून आहेत. मृतदेहांचं शवविच्छेदन होऊनही हे मृतदेह रुग्णालयात पडून आहेत. मृतदेहांची ओळख पटावी म्हणून डिएनए टेस्ट देखील करण्यात आली आहे. पण, पोलिस अजूनही मृतदेहांच्या नातेवाईकांचा शोध लावू शकलेले नाहीत.



गेल्या २ वर्षांपासून २० बेवारस मृतदेह या रूग्णालयात आहेत. आम्ही या मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी वारंवार संबंधित पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे. पण काहीच होत नाही. पोलिसांनी त्यांचं काम नीट केल्यास ही समस्या लवकरच दूर होईल. पण तसं होताना दिसत नाही.

- डॉ. प्रदीप आंग्रे, वैद्यकीय अधिकारी, शताब्दी रुग्णालय, कांदिवली



भायखळ्याच्या जे. जे रुग्णालयात वर्षभरात ७५० बेवारस मृतदेह येतात. तर, कूपर, राजावाडी या पालिका रुग्णालयात दिवसाला २ ते ३ बेवारस मृतदेह येतात.

याविषयी 'मुंबई लाइव्ह'ने महापालिका रुग्णालयाचे प्रमुख आणि केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील रुग्णालयात असणाऱ्या बेवारस मृतदेहांच्या संख्येवर चिंता व्यक्त केली.


महापालिका रूग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. कधी कधी तर असेही रुग्ण येतात ज्यांचं कुणीच नातेवाईक नसतं. अशा रुग्णाचा मृत्यू झाल्यास, त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि शवविच्छेदन करावं लागतं. पण त्यानंतर हा मृतदेह घेण्यासाठी कुणीच पुढं येत नसल्याने तो तसाच शवागृहात पडून राहतो. बेवारस मृतदेहाच्या अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेसाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे बेवारस मृतदेह इथंच ठेवले जातात.

- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय


नियमानुसार फक्त २ आठवडे

एखाद्या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह रूग्णालयात आणला की त्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यानंतर शवविच्छेदनासह डिएनए टेस्ट आणि फिंगर प्रिंट घेतले जातात. या सर्व प्रक्रियेला आठवडा लागतो. त्यानंतर तो मृतदेह त्याच्या नातेवाईकाचा शोध लागतं नाही, तोपर्यंत शवागृहात ठेवला जातो. नियमानुसार बेवारस मृतदेह फक्त २ आठवडेच रूग्णालयात ठेवता येतो. पण या नियमाला बगल देण्यात येत असल्यानेच बेवारस मृतदेहाच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रक्रियेत पोलिस अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.



हेही वाचा-

वाडियात 'फॅक्टर 7'च्या रूग्णावर उपचार; जगभरातला दुर्मिळ आजार


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा