उन्हाळ्यात कलिंगड जरुर खा

 Mumbai
उन्हाळ्यात कलिंगड जरुर खा
Mumbai  -  

उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात दोन दिवसांपासून पारा 35 वर कायम आहे. या उष्णतेत गारवा मिळावा यासाठी रसाळ फळे आणि थंड पेय सेवन केलं जातं. उन्हाचा पारा वाढल्याने सध्या बाजारात कलिंगड आणि काकड्यांची मागणी वाढली असून मोठ्या प्रमाणात कलिंगड विक्रीसाठी दाखल झाली आहेत. बाजारात कलिंगडाची किंमत जवळपास 30 ते 40 रुपये आहे. या उकाड्यात कलिंगड खाणं हे आरोग्यासाठी उत्तम असल्यामुळे मुंबईकरांनी आंब्यापेक्षा कलिंगडला जास्त पसंती दिली आहे.

कलिंगडात ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्व असून, पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आरोग्याकरता उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाणे फायद्याचे ठरते, असे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे घामाघूम झालेल्या मुंबईकरांना भर उन्हात गार वाटवे यासाठी पौष्टीक कलिंगड हा चांगला पर्याय आहे. यासंदर्भात दादरच्या काही कलिंगड विक्रेत्यांशी मुंबई लाइव्हने चर्चा केली असता कलिंगडला बाजारात दिवसेंदिवस फार मागणी असल्याचं सांगितलं.

कलिंगडातील व्हिटामिन ए, सी शरीरासाठी चांगलं स्त्रोत मानलं जातं. कलिंगड शरीरातील आद्रता टिकवून ठेवतं, त्यामुळे शरीराचं तापमान संतुलित राहतं. तसेच लाईकोपिन नावाचं फायटो केमिकल असतं ज्यामुळे ते कर्करोग प्रतिबंधक मानलं जातं. यासह कलिंगड ह्रद्यरोगासही प्रतिबंध करतं. त्यामुळे दिवसातून एकदा तरी कलिंगड खा आणि स्वस्थ रहा.

Loading Comments