घाटकोपर स्थानकावर महिलेची प्रसुती, 'वन रुपी क्लिनिक'मध्ये त्वरीत उपचार

Ghatkopar
घाटकोपर स्थानकावर महिलेची प्रसुती, 'वन रुपी क्लिनिक'मध्ये त्वरीत उपचार
घाटकोपर स्थानकावर महिलेची प्रसुती, 'वन रुपी क्लिनिक'मध्ये त्वरीत उपचार
See all
मुंबई  -  

मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांवर नुकत्याच सुरू झालेल्या 'वन रुपी क्लिनिक'ची उपयोगीता मंगळवारी खऱ्या अर्थाने सर्वांसमोर आली. दुपारी 2 वाजेच्या सुमारास कर्जतकडे जाणाऱ्या लोकलमधील एका महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्यानंतर तिला त्वरीत घाटकोपर रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले. पण रुग्णालयाकडे धाव घेण्याअगोदरच या महिलेची स्थानकावर प्रसुती झाली. तिने एका गोड बाळाला जन्म दिल्यानंतर तिला त्वरीत 'वन रुपी क्लिनिक'मध्ये नेण्यात आले. आई आणि बाळावर प्राथमिक उपचार करून त्यांना राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले. 

गुडीया मोहम्मद इबरार शेख असे या महिलेचे नाव आहे. गुडीया आणि तिचा पती टिटवाळ्याहून कुर्ल्याला नातेवाईकांना भेटायला गेले होते. त्यानंतर ते कुर्ल्याहून कल्याणकडे जात असताना कर्जत लोकलमध्ये गुडीयाला अचानक कळा सुरू झाल्या. घाईघाईने तिला स्थानकावर उतरवण्यात आले. 

स्थानकावर उपस्थित महिला, जीआरपी आणि आरपीएफच्या मदतीने या महिलेची स्थानकावरच प्रसुती झाली. त्यानंतर या महिलेला त्वरीत 'वन रुपी क्लिनिक'मध्ये नेण्यात आले. तेथे 'वन रुपी क्लिनिक'चे संस्थापक डॉ. राहुल घुले यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेवर आणि बाळावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर दोघांनाही घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.क्लिनिक सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच आम्ही इतक्या आपत्कालीन स्थितीत काम केले. मंगळवारी दुपारी 2 वाजता त्या महिलेला अचानक कळा सुरू झाल्या. पण, क्लिनिकपर्यंत पोहोचण्याच्या आतच तिची स्थानकावर प्रसुती झाली. तिला पुढच्या उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. बाळ आणि आई दोघेही आता सुखरुप आहेत.
डॉ. राहुल घुले, संस्थापक, वन रुपी क्लिनिक

या बाळाचे वजन अडीच किलो आहे. या महिलेकडून प्रसुतीसाठी फक्त एक रुपया घेण्यात आला. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारचे क्लिनिक असणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

आपल्याला मुलगी झाली याचा आनंद तर आहेच. पण, 'वन रुपी क्लिनिक'मधून मिळालेली तत्काळ सेवा यामुळे आम्हाला आणखी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया बाळाचे वडील मोहम्मद इबरार यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.


स्थानकावर उतरत असतानाच महिलेची प्रसुती झाली. प्रवाशांमध्ये एक महिला नर्स होती. तिने लगेचच बाळाची नाळ कापली. ट्रेन स्थानकात दाखल झाल्यावर स्ट्रेचरवरुन महिलेला आणि बाळाला 'वन रुपी क्लिनिक'मध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी महिलेवर उपचार करुन तिला राजावाडी रुग्णालयात पाठवले. 

- प्रगती दिलीप काळे, होमगार्ड, कुर्लाडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.