Advertisement

संचारबंदी नव्हे, स्वमग्न मुलांना समजून घेण्याची सुवर्णसंधी!

कोरोनामुळे झालेल्या संचारबंदीमुळे आपल्या सर्वांप्रमाणे स्वमग्न मुलं आणि त्यांचे पालकही घरातच बंदित झाले आहेत. सक्तीने घरात बसून स्वमग्न मुलं तसंच त्यांच्या पालकांची चीडचीड होऊ शकते.

संचारबंदी नव्हे, स्वमग्न मुलांना समजून घेण्याची सुवर्णसंधी!
SHARES

स्वमग्नता किंवा ऑटिझम ही एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे. ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही. अशी व्यक्ती आपल्याच विश्‍वात आणि विचारात रममाण असतात. अशा व्यक्ती संवेदनांचे अर्थ लावू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. ऑटिझमग्रस्त मुलांना समाजात मिसळताना असंख्य अडचणी येतात. त्याला कारण आहे त्यांच्या मनातील अनाकलनीय चिंता, नकारात्मक वर्तवणूक, असंतुलित सामाजिक व्यवहार आणि संवाद साधता न येणे.  त्यामुळेच अशा मुलांच्या पालकांना या मुलांना घेऊन सामाजिक कार्यक्रमात सहभागी होणे किंवा मॉल, बागा, उद्यान यांसारख्या सामाजिक ठिकाणी जाणे अवघड होऊन बसते. त्यामुळे स्वमग्न मुलं आणि त्यांचे पालक समाजापासून आपोआप तुटत जातात. दुर्दैवाने अशा मुलांना आणि त्यांच्या पालकांना समजून घेईल अशी सपोर्ट सिस्टिम आपल्या समाजात निर्माण झालेली नसल्यामुळे त्यांना एक प्रकारच्या सामाजिक कुचंबणेलाही सामोरं जावं लागतं.

ऑटिस्टिक म्हणजेच स्वमग्न मुलांच्या ज्या वागणुकीच्या समस्या (बिहेव्हिअर इश्यूज) आहेत, त्यामागची कारणं समजून घेणं सर्वात महत्वाचं आहे.

  • मुलांमध्ये वारंवार जे बिहेव्हिअर इश्यूज दिसतात त्यांमागे खरंतर अनोळखी- आपल्याला माहित नसलेल्या संवेदना किंवा शारीरिक गरजा असू शकतात, ज्यांची पूर्तता न झाल्यामुळे मूल वारंवार काही हालचाली किंवा वागणुकीद्वारे ती गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल. पालकांचं दररोजचं जगणं हे इतकं धावपळीचं असतं की, मुलांवर उपचार करणा-या थेरपिस्टचा दृष्टीकोनही समजून घ्यायला त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही. पण संचारबंदीमुळे आपल्यापैकी प्रत्येकाकडे पुरेसा वेळ आहे. त्यामुळे मूल वारंवार काही विशिष्ट हालचाली किंवा वागणुकीतून नेमकं काय सांगू पाहतंय, ह्याचं निरीक्षण करणं आपल्याला शक्य आहे. विविध एक्टिव्हिटीजद्वारे जर का मुलाची ती विशिष्ट गरज आपल्याला पूर्ण करता आली, तर कदाचित मुलाच्या त्या बिहेव्हिअर इश्यूची कायमची सोडवणूक होऊ शकते.
  • स्वमग्न मुलांबाबत असंही आढळलं आहे की, ह्या मुलांची जी चीडचीड व्यक्त होत असते ती काही दरवेळी एखाद्या विशिष्ट संवेदनापूर्तीसाठी किंवा शारीरिक गरजपूर्तीसाठी नसते, तर अनेकदा पालकांच्या अपेक्षांमुळेच मुलं चीडचीड करतात किंवा आक्रमक वागतात. सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह पद्धतीने मुलांनी वागावं. असं पालकांना वाटत असतं किंवा मुलाने विशिष्ट पद्धतीने बोलावं किंवा अभ्यास करावा ह्यासाठी पालक मुलांवर दबाव टाकतात.  
  • स्वमग्न मुलांच्या वागणुकीतील काही समस्या तर पालकांमुळेच निर्माण झालेल्या असतात. कधीकधी मुलांच्या वागणुकीविषयी पालकांचे म्हणजे आईचे आणि वडीलांचे मतभेद असतात. त्यामुळे ते आपापल्या पद्धतीने मुलाला हाताळण्याचा प्रयत्न करतात.


आपण नेमकं काय करू शकतो?

संचारबंदीचा हा काळ म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक सुवर्णसंधीच घेऊन आला आहे. आपल्या कुटुंबातील व्यक्ती आणि त्यांच्या आंतरवैयक्तिक गरजा ओळखण्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे. स्वमग्न मुलांचं नॉनव्हर्बल कम्युनिकेशन, म्हणजे शब्दांच्या पलीकडे त्यांच्या देहबोलीतून ते जे व्यक्त करता असतात ते, जर पालकांना समजत असेल तर मुलांना खूप बरं जातं. पालकांचे नॉनव्हर्बल संकेत मुलांनाही समजतात. स्वमग्न मुलांसोबतचा हा सूक्ष्म पातळीवरील ‘नि:शब्द संवाद’ त्यांना किमान कुटुंबात तरी ‘सहज’ बनवतो. पालक मुलांना हे कर- ते कर असं सांगत- शिकवत बसत नाहीत, तर मुलांनी जे जे करणं आवश्यक आहे ते त्यांच्यासमोर स्वत: प्रेमाने, आपुलकीने करतात. पण मुलांकडून मात्र कोणत्याही अपेक्षा ठेवत नाहीत

घरातल्या दैनंदिन कामांत पालकांनी स्वमग्न मुलांना सहभागी करून घ्यायला हवं. जेवण बनवणं, घर आवरणं, स्वच्छ ठेवणं, भांडी घासणं, कपड्यांची काळजी घेणं अशा नेहमीच्या गोष्टींमध्ये पालकांनी मुलांना सक्तीने नव्हे तर प्रेमाने सहभागी करून घ्यायला हवं. कोणती वस्तू कुठे ठेवायची ह्याची मुलांना सवय लावता येऊ शकते. ह्या वस्तूंशी आपला संबंध काय आणि रोजच्या आयुष्यात त्या वस्तूंचं महत्व काय, ह्याबाबत मुलांना माहिती देऊन त्याच्याशी साहचर्य प्रस्थापित होणं आवश्यक असतं.


पालकांच्यातील, म्हणजे आई-वडीलांमधील परस्परसंबंध सुधारण्यासाठीही आताची वेळ सर्वोत्तम आहे. आई-वडीलांचे एकमेकांशी चांगले संबंध असतील, त्यांच्यात योग्य संवाद असेल, तर मुलाच्या सर्वांगीण विकासास मदतच होईल.

अगदी थोडक्यात सांगायचं तर, घराच्या चार भिंतींच्या आत स्वमग्न मुलाचा वावर सहज आणि स्वतंत्र होण्यासाठी तसंच ख-या अर्थाने ते कुटुंबातील सदस्यांशी जोडले जाण्यासाठी सध्याचा संचारबंदीचा काळ एक सुवर्णसंधी घेऊन आलेला आहे. त्या संधीचा फायदा उठवणं, हे आपल्याच हातात आहे.

- डॉ. सुमित शिंदे,

(पेडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपिस्ट, संस्थापक-चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा