मुंबईसारख्या शहरात पुरुष असो की महिला, दिवसातील किमान 8 तास तरी कामावर घालवावे लागतात. त्यात जर तुम्ही मीडिया किंवा कॉर्पोरेट ठिकाणी काम करत असाल, तर मग सगळ्याच गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात. त्यातूनच जडतात बरेचसे कायमस्वरुपी आजार. ज्याचा त्रास आपल्या कुटुंबीयांनाही होतो.
असाच एक आजार म्हणजे डायबिटीज..अर्थात मधुमेह...जो फास्टफूडचं अती सेवन करण्याने, जास्त गोड खाल्ल्याने आणि त्यामुळे वाढणाऱ्या वजनामुळे होतो. पण, याचा सर्वात जास्त त्रास गरोदर महिलांना होतो. होणाऱ्या बाळावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
जगभरात दरवर्षी 14 नोव्हेंबरला ‘जागतिक मधुमेह दिन’ साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर डायबिटीज असलेल्या महिलांनी काय करावं? या विषयी कामा रुग्णालयाच्या ‘वैद्यकीय अधीक्षिका आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांच्याशी ‘मुंबई लाइव्ह’ने खास चर्चा केली. या चर्चेतून समोर आलेल्या काही महत्त्वपूर्ण बाबी:
डायबिटीज असलेल्या महिलांना आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्वनियोजित सल्ला दिला जातो. म्हणजेच, गर्भधारणा झाल्यानंतर समस्या उद्भवण्यापेक्षा गर्भधारणेच्या आधीच त्याचं नियोजन करायचं. ज्यात पती-पत्नी दोघांचीही ब्लड शुगर लेवल नियंत्रणात आली पाहिजे. याला ‘ग्लायसेमिक कंट्रोल’ असं म्हणतात.
ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये आल्यानंतर जोडप्याने ‘ग्लायकोसायलेटेड हेमोग्लोबिन टेस्ट’ करुन घ्यायची. ती टेस्ट जर सामान्य लेवलवर असेल तर मागच्या 3 महिन्यांचा रेकॉर्ड दाखवते. या टेस्टमध्ये जर डायबिटीज कंट्रोलमध्ये दाखवत नसेल, तर त्या जोडप्याला गर्भधारणा न होऊ देण्याचा सल्ला दिला जातो. जर सल्ला घेतला नाही आणि गर्भधारणा झाली, तर त्याचा महिलेच्या शरीरावर आणि बाळावर परिणाम होतो.
बाळाच्या डोक्याच्या, पाठीच्या भागाला व्यंगत्व येऊ शकते. आईची शुगर रक्तातून बाळाला जात असते. त्यामुळेच बाळाच्या पॅनक्रिया किंवा स्वादूपिंड प्रक्रियेची वाढ होते. त्यामुळे त्याच्या चयापचय क्रियांवर परिणाम होतो. त्यातून बाळाचं वजन वाढतं. पण, फुफ्फुसांची परिपक्वता जास्त नसते. त्यामुळे बऱ्याचदा बाळाचं वजन 4 किलोपर्यंत असतं. बाळाचं वजन जास्त असल्यामुळे सिझेरियन प्रसूती करावी लागते.
प्रसूती करताना बाळाचे खांदे, डोकं अडकण्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे प्रसूतीसाठी आणखी समस्या निर्माण होते. सिझेरियन प्रसूती करावी लागते. प्रसूतीनंतर बाळाच्या शुगरमध्ये चढ-उतार होत असतात. त्यामुळे त्याला एनआयसीयू, पिडीआट्रिशियनमध्ये निरीक्षणासाठी ठेवावं लागतं.
गर्भधारणा झाल्यानंतर मातेचं वजन मोठ्या प्रमाणात वाढतं. ब्लडप्रेशरचा त्रास होऊ शकतो. शिवाय, डायबिटीज कंट्रोल होतो किंवा नाही होत. मात्र त्यासाठी इन्सुलिन मोठ्या प्रमाणात घ्यावं लागतं.
जर गर्भधारणा करायची असल्यास पूर्वनियोजित सल्ला महत्त्वाचा आहे. शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. असं न केल्यास त्याचा परिणाम बाळावर होतो. त्यासाठी समाजात जनजागृती असणं गरजेचं आहे.
डॉ. राजश्री कटके, वैद्यकीय अधीक्षिका आणि स्त्री-रोग तज्ज्ञ, कामा हॉस्पिटल
गर्भधारणेनंतर व्यायाम, योगा, वॉक करणं महत्त्वाचं असतं. शिवाय, डोळे, किडनी आणि ह्रद्य यांची तपासणी करुन घेणंही गरजेचं असतं.
शुगर कमी असलेले पदार्थ खाणं. पालेभाज्या, मेथीचं पाणी, कारलं, कडधान्य, ज्वारी या पासून बनलेले पदार्थ खाणं अशा परिस्थितीत गरजेचं असतं. तेलकट पदार्थ, जास्तीची शुगर घेणं टाळावंच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घेणं.
जरी गर्भधारणा राहिली तरी 16 ते 18 आठवड्यांमध्ये महिलेची 3 डी किंवा 4 डी सोनोग्राफी करुन घेतली पाहिजे. ज्यामुळे बाळाला व्यंग आहे का? किंवा काही समस्या आहे का? याचा 20 आठवड्यांच्या आत शोध घेता येतो. त्यामुळे जर असं झालंच, तर कायद्यानुसार गर्भपात करता येऊ शकतो.
डॉ. राजश्री कटके, वैद्यकीय अधीक्षिका आणि स्त्रारोगतज्ज्ञ, कामा हॉस्पिटल
बरेचदा आपल्याला डायबिटीज सारखं काही आहे याची माहितीच नसते. त्यामुळे आपण लक्ष देत नाही. पण, असं करणं धोकादायक ठरु शकतं. सकारात्मक विचार करणं आणि कमी ताण घेणं हाच सर्वात महत्त्वाचा सल्ला डॉ. कटके यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिला आहे.
हेही वाचा