अपंगांसाठी योगा 'संजीवनी' - डाॅ. छाया माने

कोणत्या प्रकारचे योगा शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना उपयुक्त आहेत, यावर जागतिक योग दिनानिमित्त योगा थेरपिस्ट डाॅ. छाया माने यांनी प्रकाश टाकला अाहे.

SHARE

शारीरिकदृष्ट्या प्रबळ राहावं यासाठी प्रत्येक जण प्रयत्नात असतो. शरीराला सुदृढ आणि सक्षम करण्यासाठी आजकाल वेगवेगळे उपाय लोक करत असल्याचं दिसून येतं. कोणी जीमला जातं,  तर कोणी योगा, झुंबा डान्स करतं. तसंच स्वतःला 'मेंटेन' ठेवण्यासाठी लोक डायट फाॅलो करतात. याशिवाय सध्याच्या ताणतणावाच्या अायुष्यात योगा करण्याकडे लोकांचा कल वाढला अाहे.

मनःशांतीसाठी योगा अावश्यक असल्याचं सर्वांचच मत बनलं अाहे. शारीरिकदृष्ट्या सृदृढ लोकांबरोबरच अाज अपंगांनाही योगा उपयुक्त ठरत अाहे. योगाच्या सहाय्याने ते आपलं शरीर प्रबळ बनवू शकतात. नेमक्या कोणत्या प्रकारचे योगा शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना उपयुक्त आहेत,  यावर जागतिक योग दिनानिमित्त योगा थेरपिस्ट डाॅ. छाया माने यांनी प्रकाश टाकला अाहे.

अपंगांसाठी योगा महत्त्वाचाच

सामान्य लोकांप्रमाणे अपंग व्यक्तींना योगा करणं महत्वाचं आहे. एकाच ठिकाणी बसून किंवा शरीराची हालचाल न केल्याने अपंग व्यक्तींच्या पचनशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे पचन शक्ती सुधारण्यासाठी योगा करणे गरजेचे आहे.

अपंगांसाठीची योगासने

प्राणायाम : प्राणायाम हे सर्वात महत्वाचे आसन आहे. प्राणायामामुळे आपल्याला ध्यानस्थ होता येते. एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करून प्राणायाम केल्यास उच्च रक्तदाब कमी होतो. पूर्णपणे अपंगत्व आलेल्या रुग्णांनी उशीच्या आधाराने बसावे आणि प्राणायाम करावा. यामुळे मानसिकदृष्ट्या सुदृढ बनण्यास मदत होते.

योगनिद्रा : अपंग व्यक्तींना योगनिद्रा करणं अावश्यक अाहे. कारण यामध्ये आपण निद्रा अवस्थेत असूनही आपल्या सर्व इंद्रियांवर लक्ष केंद्रित करू शकतो.

सूक्ष्म व्यायाम : व्हीलचेअरवर असलेल्या लोकांसाठी खांद्यांचे व्यायाम आणि हातापायांचे हलके व्यायाम करता येऊ शकतात. त्यामुळे स्नायू मोकळे होतात.

ओमकार ध्वनी : योगासनांमध्ये ओमकार ध्वनी हा महत्वाचा बीजमंत्र आहे. "अ , ऊ आणि म् "  एकत्र येऊन ओमकार ध्वनी बनतो. ओमकार हा १० सेकंदाचा असावा, ज्यामध्ये अ ३ सेकंद, ऊ २ सेकंड तर म् चा उच्चार लांबवत ५ सेकंद इतका असावा. ओमकार ध्वनीतून शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो.  


अपंगत्वावर मात करण्यासाठी योगा सर्वोत्तम

पोलिओ किंवा अपघाताने झालेल्या अपंग रुग्णांसाठी त्यांचे जे अवयव सक्षम आहेत त्यांची हालचाल करणे गरजेचे आहे.  त्यामुळे आपले स्नायू मोकळे होतात. अपंगत्वामुळे शरीरात होणाऱ्या तीव्र वेदना, पाठदुखी किंवा सांधे दुखीसाठी योगा हा एकमेव उपाय आहे. अपंगत्वअाल्याने आपल्यातला आत्मविश्वास आपण गमावून बसतो.  पण तोच आत्मविश्वास उंचावण्यासाठी योगा परिपूर्णपणे मदत करतो. त्यामुळेच योगा करणं अत्यावश्यक आहे. दररोज ३० ते ४५ मिनिटे नियमितपणे योगा करणं गरजेचं आहे, असं वोक्हार्ट रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. मुदीत खन्ना यांनी सांगितलं.


 योग हा सुखी जीवनाचा महामार्ग आहे. आपल्या धकाधकीच्या आयुष्यात स्वतःकडं लक्ष द्यायलादेखील वेळ नसतो. वेळीअवेळी फास्टफूड खाणं, व्यसनं यामुळं आपण रोगांना आमंत्रण देतो. योगाने शरीरांतर्गत क्रिया व्यवस्थित होतात. त्याप्रमाणेच शरीरातील स्नायू लवचिक होणे, लवकर उठण्याची सवय लागणे, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुदृढ राहण्यास योगामुळे मदत होते.
 -  योगा थेरपिस्ट डाॅ. छाया माने
हेही वाचा -

सेंट जॉर्जेस रुग्णालयात होणार लिंगपरिवर्तन विभाग

ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये स्लॅबचा भाग कोसळला 

संबंधित विषय
ताज्या बातम्या