Advertisement

धारावीकरांसाठी सेक्टर-५ मध्ये आणखी २ टाॅवर


धारावीकरांसाठी सेक्टर-५ मध्ये आणखी २ टाॅवर
SHARES

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सेक्टर-५ मध्ये लवकरच २ टाॅवर उभे राहणार आहेत. सेक्टर-५ प्रकल्पातील टाॅवर क्रमांक २ आणि ३ च्या प्रस्तावाला गेल्या आठवड्यात धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी)ने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे लवकरच या २ टाॅवरच्या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.


धारावीचं शांघाय कधी?

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख पुसून टाकत धारावीचं शांघाय करण्यासाठी सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. हा प्रकल्प अद्याप पूर्णपूणे मार्गी लागलेला नाही. असं असलं तरी सेक्टर-५ चा पुनर्विकास पुढे नेण्याच्यादृष्टीने म्हाडाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच याआधी सेक्टर-५ मध्ये ३५८ घरांचा एक टाॅवर उभारत त्यात ३३१ धारावीकरांचं पुनर्वसन करण्यात मुंबई मंडळाने यश मिळवलं आहे.


काम वेगात सुरू

तर, दुसरीकडे टाॅवर क्रमांक १ लगतच असलेल्या मोकळ्या जागेत टाॅवर क्रमांक ४ आणि ५ चं काम मुंबई मंडळाकडून वेगात सुरू आहे. या ४ आणि ५ क्रमांकाच्या टाॅवरमध्ये ६७२ घरांचा समावेश असून सध्या या दोन्ही टाॅवरचं काम ५ मजल्यापर्यंत पूर्ण झाले आहे. हे दोन्ही टाॅवर मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करत या टाॅवरचा ताबा धारावीकरांना मे २०१८ पर्यंत देण्याचा मंडळाचा मानस असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.


आराखडा मंजुरीसाठी डीआरपीकडे

सेक्टर-५ मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असतानाच मंडळाने आता टाॅवर क्रमांक २ आणि ३ मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या दोन्ही टाॅवरचा आराखडा तयार करत हा आराखडा डीआरपीकडे मंजुरीसाठी पाठवला होता. या आराखड्याला गेल्या आठवड्यात डीआरपीने मंजुरी दिल्याने लवकरच २२ मजली दोन टाॅवरच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे. दरम्यान टाॅवर क्रमांक २ आणि ३ मध्ये एकूण ६८७ घरे असणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा