Advertisement

गोरेगावमध्ये म्हाडाची ७००० घरं, एफएसआयमुळे २००० घरं वाढली


गोरेगावमध्ये म्हाडाची ७००० घरं, एफएसआयमुळे २००० घरं वाढली
SHARES

पंचवीस वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर जिंकलेल्या गोरेगाव, पहाडी येथील २५ एकर जागेवर म्हाडाच्या मुंबई मंडळाने ५००० घरे बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार यासाठी निविदाही मागवल्या असून येत्या काही महिन्यांतच घरांच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे. पण आता या जागेवर ५००० नव्हे, तर ७००० घरे बांधली जाणार आहेत. कारण याआधी मुंबई मंडळाला ३ एफएसआयनुसार या जमिनीवर बांधकाम करता येणार होतं. पण आता या जमिनीवरील बांधकामासाठी ३ एेवजी ४ एफएसआय मिळाल्यानं घरांचा आकडा ५००० वरून ७००० वर गेल्याची माहिती मुंबई मंडळातील सूत्रांनी दिली आहे.


२५ वर्षांनी मिळाली २५ एकर जमीन

गोरेगाव पहाडी येथे म्हाडाच्या मालकीच्या २५ एकर जागेवर कुसुम शिंदे नावाच्या महिलेनं मालकी हक्क दाखवला आणि २५ वर्षे यावरून म्हाडा आणि कुसुम शिंदे यांच्यामध्ये न्यायालयीन वाद रंगला. अखेर म्हाडाने न्यायालयीन लढाई जिंकत दोन वर्षांपूर्वी ही जमीन ताब्यात मिळवली होती.

याच जमिनीवरील अतिक्रमणं हटवत मुंबई मंडळाने येथे घरं बांधण्याचा निर्णय घेत त्यासाठीचा आराखडा तयार केला आहे. तर दुसरीकडे घरांच्या बांधकामासाठी निविदाही मागवल्या आहेत. फेब्रुवारीपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत असून त्यानंतर निविदा अंतिम करत एप्रिल-मेपर्यंत घरांच्या कामाला सुरूवात करण्याचा मुंबई मंडळाचा मानस आहे.


१ एफएसआयमुळे वाढली घरांची संख्या

उपनगरामध्ये बांधकामासाठी ४ एफएसआय असताना मुंबई मंडळाने मात्र पहाडी येथील १८ एकरवरील घरांच्या बांधकामासाठीचा आराखडा ३ एफएसआयनुसार तयार केला. त्यामुळे येथे मुंबई मंडळाला ५११९ घरे बांधता येणार होती. या आराखड्याचा नव्यानं अभ्यास केला असता ४ एेवजी ३ एफएसआय वापरून आराखडा तयार केल्याची चूक नुकतीच मुंबई मंडळाच्या लक्षात आली आहे. आता ही चूक सुधारत मुंबई मंडळाच्या गोरेगाव विभागाने नव्यानं आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


नवा आराखडा तयार करण्याचं काम सुरु

त्यानुसार आता नव्याने आराखडा तयार करण्यात येणार असून ४ एफएसआयनुसार आता घरे बांधली जाणार असल्याने घरांची संख्या ३० टक्क्यांनी वाढणार असल्याचं समजतं आहे. ३० टक्क्यांनुसार १५०० ते २००० घरे वाढण्याची शक्यता असल्याने पहाडी येथील म्हाडाच्या घरांचा आकडा आता ५००० वरून थेट ७००० वर पोहचणार असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.


गरीबांसाठीच्या घरांचा आकडा वाढणार

मूळ आराखड्यानुसार ५११९ घरांपैकी २८५५ घरं ही अत्यल्प गटासाठी अर्थात अार्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. अल्प गटासाठी ९५२, मध्यम गटासाठी ७७५, तर उच्च गटासाठी ५३७ घरे राखीव असणार आहेत. आता मात्र घरांचा आकडा ७००० वर गेल्यानं गरीबांसाठीच्या, अत्यल्प गटासाठीच्या घरांसह सर्वच गटातील घरांमध्येही वाढ होणार आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा