Advertisement

धारावी पुनर्विकास- कोण मारणार बाजी? अदानी कि सेक्लिंक?

राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा धारावी पुनर्विकास प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून रखडला आहे. आता मात्र हा प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धारावी पुनर्विकास- कोण मारणार बाजी? अदानी कि सेक्लिंक?
SHARES

राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा धारावी पुनर्विकास प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून रखडला आहे. आता मात्र हा प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण तब्बल पंधरा वर्षांनंतर या प्रकल्पासाठी दोन बड्या कंपन्या पुनर्विकासासाठी पुढे सरसावल्या आहेत. देशातील बडी कंपनी अशी ओळख असलेल्या अदानीसह दुबईतील सेक्लिंक (SECLINK) या कंपन्यांनी पुनर्विकासासाठी उत्सुकता दाखवत निविदा सादर केल्याची माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्पा (डीआरपी)तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे आता अदानी कि सेक्लिंक कोण बाजी मारतं आणि हा प्रकल्प मार्गी लावत हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.


तिसऱ्या वेळेस अखेर प्रतिसाद

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी डीआरपीकडून २००९ पासून तीनदा निविदा काढण्यात आल्या आहेत. पहिल्यांदा काढण्यात आलेली निविदा तांत्रिक अडचणीमुळे रद्द करण्यात आली. तर त्यानंतर काढण्यात आलेल्या निविदेला प्रतिसादच न मिळाल्याने निविदेला तब्बल पाच वेळा मुदतवाढ देण्याची मोठी नामुष्की डीआरपीवर ओढावली होती. इतका महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गीच लागत नसल्याने शेवटी राज्य सरकारने प्रकल्पाला विशेष प्रकल्पाचा दर्जा देत सार्वजनिक-खासगी कंपनीची स्थापना करत त्यातून प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डिसेंबर २०१८ मध्ये तिसऱ्यांदा धारावी पुनर्विकासासाठी निविदा मागवण्यात आल्या. तिसऱ्यांदा मागवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेलाही प्रतिसाद न मिळाल्याने निविदेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. दुसऱ्या मुदतवाढीत अखेर दोन निविदा सादर झाल्या आणि डीआरपीनं सुटकेचा निश्वास सोडला. यावेळेस निविदेला प्रतिसाद मिळाला नसता तर हा प्रकल्प आणखी रखडला असता. दरम्यान निविदेला दोन कंपन्यांचा प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त सर्वप्रथम 'मुंबई लाइव्ह'नं दिलं होतं.


लवकरच कंत्राट


१५ जानेवारीला निविदा सादर करण्याची अंतिम तारीख होती. त्यानुसार १६ जानेवारीला डीआरपीकडून निविदा खुल्या करण्यात आल्या असून अदानी आणि दुबईतील नामांकित अशा सेक्लिंक कंपनीनं धारावी पुनर्विकासासाठी निविदा सादर केल्या आहेत. आता या दोन्ही कंपन्यांच्या निविदांची छाननी करत येत्या दोन आठवड्यात कंत्राट देण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात येईल. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल आणि मग राज्य सरकार दोन कंपन्यांपैकी कुणाला कंत्राट द्यायचं याचा निर्णय घेईल असंही डीआरपीमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महिन्याभरात अदानी की सेक्लिंक कोण धारावीला आकार देणार, धारावीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं ठिकाण अशी नवी ओळख देणार हे समजेल.



हेही वाचा - 

नाताळ-नववर्षासाठीच्या विशेष गाड्यांमुळे मध्य रेल्वेला १ कोटींची कमाई



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा