Advertisement

मेट्रो-३साठी आता मुंबईच्या पोटात ब्लास्टिंग, रहिवाशांमध्ये नाराजी

भुयारी मार्गाचे काम वेगात व्हावे, यासह काही ठिकाणचे खडक अत्यंत कठीण असल्याने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) कडून अशा ठिकाणी ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतेच पोलिसांकडून कुलाबा-चर्चगेट परिसरातील रहिवाशांना ना हरकत प्रमाणपत्रासाठी नोटिसा पाठवल्या जात आहेत,

मेट्रो-३साठी आता मुंबईच्या पोटात ब्लास्टिंग, रहिवाशांमध्ये नाराजी
SHARES

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो मार्गातील भुयारी मार्गाच्या कामासाठी कुलाब्यापासून सिप्झपर्यंत मुंबईच्या पोटात १७ टीबीएम अर्थात टनेल बोअरिंग मशिन घुसवले जात आहेत. तब्बल दोन वर्षे हे मशिन मुंबईच्या पोटात राहून भुयारी मार्ग तयार करणार आहे. असे असताना आता भुयारी मार्गासाठी काही ठिकाणी ब्लास्टिंगचाही वापर केला जाणार आहे.


कुलाबा-चर्चगेटमध्ये रहिवाशांना नोटिसा

भुयारी मार्गाचे काम वेगात व्हावे, यासह काही ठिकाणचे खडक अत्यंत कठीण असल्याने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) कडून अशा ठिकाणी ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतेच पोलिसांकडून कुलाबा-चर्चगेट परिसरातील रहिवाशांना ना हरकत प्रमाणपत्रासाठी नोटिसा पाठवल्या जात असून अशीच एक नोटीस 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागली आहे.


इमारतींच्या चिंतेने रहिवासी नाराज

३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गाच्या कामाला सुरूवात झाली असून भुयारी मार्गासाठी अर्थात खोदकामासाठी टीबीएम या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर एमएमआरसीकडून करण्यात येत आहे. हे तंत्रज्ञान अत्याधुनिक आणि सुरक्षित असल्याचा दावा एमएमआरसीकडून केला जात आहे. रहिवासी मात्र या कामामुळे चिंताग्रस्त आहेत. गिरगावसह दक्षिण मुंबईतील मेट्रो-३ मार्गालगतच्या सर्वच इमारती जुन्या असल्याने या इमारतींना धक्का बसण्याची शक्यता व्यक्त करत रहिवासी या कामाबद्दल नाराज असल्याचे चित्र आहे.

टीबीएमबरोबरच आता ब्लास्टिंग करताही खोदकाम करण्याच्या कामाला लवकरच सुरूवात होणार आहे. त्यासाठी एमएमआरसीने पोलिसांच्या माध्यमातून रहिवाशांना-सोसायट्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी नोटिसा पाठवल्या जात आहेत. कफ परेड पोलिस ठाण्याकडून ज्युपिटर सोसायटीसह अन्य काही सोसायट्यांना अशा नोटिसा पाठवल्याची माहिती येथील रहिवासी रॉबिन जयसिंघानी यांनी दिली आहे.

ब्लास्टिंग करताना आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचंही या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. तर महत्त्वाचं म्हणजे रहिवाशांचा आक्षेप असल्यास तोही लेखी स्वरूपात कळवावा असंही या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. मुळात मेट्रो-३ च्या कामाला त्यातही खोदकामाला रहिवाशांचा मोठा विरोध असल्याने या ब्लास्टिंगलाही आता विरोध होण्याची दाट शक्यता आहे.


१, २, ६ आणि ७ पॅकेजमध्ये होणार ब्लास्टिंग

मेट्रो-३चं काम सात पॅकेजमध्ये केलं जात आहे. त्यातील १, २, ६ आणि ७ या पॅकेजमध्ये ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी रहिवाशांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलं जात आहे. दरम्यान, सुरूवातीपासूनच मेट्रो-३ ला होणारा विरोध लक्षात घेता ब्लास्टिंग होणार नाही, असं एमएमआरसीकडून सांगितलं जात होतं. तर याविषयी लपवाछपवीही होत होती. पण आता या नोटिशीमुळे एमएमआरसीचं पितळं उघडं झाल्याची प्रतिक्रियाही जयसिंघानी यांनी दिली आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा