मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आणिक-पांजरपोळ जोडरस्त्या प्रकल्पातील दोन हजार विस्थापितांच्या पुनर्वसनाचा रखडलेला प्रश्न मार्गी लावावा यासाठी विस्थापित एमएमआरडीए मुख्यालयाबाहेर उपोषणास बसले आहेत. सहा दिवसांपासून विस्थापितांचे उपोषण सुरू असतानाही एमएमआरडीएने मात्र या उपोषणकर्त्यांची म्हणावी तशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, जोपर्यंत एमएमआरडीए पुनर्वसनासंबंधी लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी माहिती उपोषणकर्ते मोतीराम खरात यांनी दिली आहे.
जोडरस्ता प्रकल्पातील आठ हजारांपैकी दोन हजार विस्थापितांचे पुनर्वसन एमएमआरडीएने न केल्याचा आरोप करत बुधवार, 4 एप्रिलपासून उपोषणास बसले आहेत. सोमवारी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार आणि समाजवादी पार्टीचे एकमेव आमदार अबू आजमी यांनी विस्थापित उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तर शेलार यांच्यासह विस्थापितांच्या शिष्टमंडळाने महानगर आयुक्त युपीएस मदान यांची भेट घेत विस्थापितांच्या मागण्या आयुक्तांसमोर ठेवल्या. त्यानुसार मदान यांनी 2000 पैकी 900 विस्थापितांचं पुनर्वसन लवकरच करण्यात येईल. तर उर्वरित 1100 विस्थापितांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया 900 विस्थापितांचे पुनर्वसन झाल्यानंतर राबवण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या आश्वासनानंतर शेलार यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती विस्थापितांना केली. मात्र जोपर्यंत एमएमआरडीएकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्यावर विस्थापित ठाम आहेत. त्यामुळे मंगळवारी आशिष शेलार आणि शिष्टमंडळासह झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तासह लेखी आश्वासन देण्यात येईल, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे मंगळवारी लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच उपोषण मागे घेण्यात येईल, असेही खरात यांनी स्पष्ट केले आहे.