Advertisement

म्हाडा लाॅटरी : अनिता तांबे पहिल्या भाग्यवान विजेत्या

साडेदहा वाजता आॅनलाईन लाॅटरीच्या सोडतीची प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया जशी सुरू झाली, १०, ९, ८,७ असं काऊंटडाऊन सुरू झालं तसा अर्जदारांच्या काळजाचा ठोका चुकण्यास सुरू झाला. संकेत क्रमांक ३६३ अत्यल्प गट, प्रतिक्षानगर इथल्या घरासाठी पहिला विजेता मिळाला. या विजेत्या होत्या अनिता तांबे.

म्हाडा लाॅटरी : अनिता तांबे पहिल्या भाग्यवान विजेत्या
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळाची लाॅटरी  म्हटलं की, वांद्रयातील रंगशारदा सभागृहात सकाळपासून उत्साहाचं वातावरण असतं. हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण व्हावं हीच इच्छा मनामध्ये घेऊन आलेल्या अर्जदारांची मोठी गर्दी असते. यंदाही मुंबई मंडळाच्या लाॅटरीसाठी हेच वातावरण होतं. पण फरक इतकाच की, यंदा लाॅटरी रंगशारदामध्ये नव्हे तर हे उत्साहाचं वातावरण होतं ते वांद्रेच्या म्हाडा भवनात. मुंबई मंडळानं यंदा म्हाडा भवनातच लाॅटरी फोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार भव्यदिव्य अशा मंडपात आणि उत्साही वातावरणात सकाळी दहाच्या सुमारास नारळ वाढवून लाॅटरीचा शुभारंभ झाला. 


ढोल, ताशांचा गजर 

साडेदहा वाजता आॅनलाईन लाॅटरीच्या सोडतीची प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया जशी सुरू झाली, १०, ९, ८,७ असं काऊंटडाऊन सुरू झालं तसा अर्जदारांच्या काळजाचा ठोका चुकण्यास सुरू झाला. संकेत क्रमांक ३६३ अत्यल्प गट, प्रतिक्षानगर इथल्या घरासाठी पहिला विजेता मिळाला. या विजेत्या होत्या अनिता तांबे. पहिल्या विजेत्या त्याही महिला ही विशेष बाब. विजेत्याचं नाव घोषित झाल्याबरोबर टाळ्यांचा गजर आणि तुतारी-ढोल-ताशांचा गजर सुरू झाला. त्यानंतर एक-एक संकेत क्रमांकाप्रमाणं लाॅटरीची प्रक्रिया पुढं जाऊ लागली.


घरं वाढणार

मुंबई मंडळाच्या १३८३ घरांसाठी १ लाख ६४ हजार ४०० अर्जदारांनी अर्ज केला होता. त्यानुसार या घरांसाठी रविवारी म्हाडा भवनात लाॅटरी फुटली. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांच्या उपस्थितीत लाॅटरीच्या सोहळ्याला सुरूवात झाली. १ लाख ६४ हजारांपैकी केवळ १३८४ अर्जदारांचं या लाॅटरीद्वारे घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळं १ लाख ३ हजार अर्जदारांचं घराचं स्वप्न स्वप्नच राहणार आहे. त्यामुळं म्हाडाची जबाबदारी वाढल्याचं म्हणत घरांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी येत्या काळात निश्चितच मुंबईतल्या घरांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न म्हाडाकडून केला जाईल, असं आश्वासन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिलं. 


१८ हजार घरं उपलब्ध 

म्हाडाच्या मुंबईतील घरांची वाढती मागणी लक्षात घेता ही मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासातून साध्य करण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला गोरेगावमधील मोतीलालनगर म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास २०१९ मध्ये मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुंबई मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी दिली. या पुनर्विकासातून रहिवाशाचं पुनर्वसन करत मुंबई मंडळासाठी १८ हजार घरं उपलब्ध होणार आहेत. तर बीडीडीसह इतर पुनर्विकास प्रकल्पातूनही मुंबई मंडळाला मोठ्या संख्येनं अतिरिक्त घरं उपलब्ध होणार आहेत. ही घरं लाॅटरीच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, त्यामुळं म्हाडाच्या घरांसाठी असलेली मागणी येत्या काळात नक्कीच पूर्ण करता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


 दक्षता विभागाला बळकटी 

म्हाडा म्हटलं की दलाल आलेच. म्हाडा आणि दलाल हे समीकरणच असून आॅनलाईन कारभारानंतरही दलालांचा म्हाडातील वावर वा हस्तक्षेप नक्कीच कमी झालेला नाही. हे पोलिस तक्रारी आणि म्हाडाकडे येणाऱ्या तक्रारींवर दिसतं. दलालांकडून विजेत्यांची आणि सर्वसामान्य नागरिक तसंच गिरणी कामगारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. मात्र त्याचवेळी म्हाडातील  दक्षता विभाग मात्र या फसवणुकीला  रोखण्यात कमी पडताना दिसत आहे. त्यामुळे दक्षता विभागाला बळकटी देण्यासाठी म्हाडानं आता राज्य सरकारला साकडं घातलं आहे. गृहनिर्माण विभागानं दक्षता विभागातील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून द्यावी असा प्रस्ताव म्हाडा प्राधिकरणाचा आहे. हा प्रस्ताव लवकरच सरकारसमोर ठेवला जाईल असं यावेळी म्हाडाकडून सांगण्यात आलं.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा