Advertisement

नायगाव, ना.म. जोशी मार्ग आणि वरळीतील झोपडपट्टीवासियांनाही वरळीत घरे


नायगाव, ना.म. जोशी मार्ग आणि वरळीतील झोपडपट्टीवासियांनाही वरळीत घरे
SHARES

नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास अखेर मार्गी लागला आहे. बीडीडीतील रहिवाशांना टोलेजंग इमारतीत 500 (कार्पेट) चौ. फुटाचे, 2 बीएचके घर मिळणार आहे. मात्र त्याचवेळी नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळीतील बीडीडी चाळींमध्ये काही झोपडपट्ट्याही आहेत. या झोपडपट्टयांचे-झोपडपट्टीवासियांचे काय होणार, असा प्रश्न होता. या झोपडपट्टीवासियांसाठी खूशखबर आहे. तिन्ही ठिकाणच्या झोपडपट्टीवासियांचा झोपडपट्टी पुनर्विकास योजनेंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार आहे. नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळी अशा तिन्ही ठिकाणच्या झोपडपट्टीवासियांना वरळीत घरे देण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

ना. म. जोशी मार्ग, नायगाव, वरळी बीडीडी चाळींच्या परिसरात झोपड्या वसल्या आहेत. या झोपड्या 50 ते 60 वर्षे जुन्या आहेत. तर स्टॉलधारकांची संख्याही बऱ्यापैकी आहे. त्यामुळे बीडीडीचा पुनर्विकास होताना या झोपडपट्ट्यांचाही पुनर्विकास होणार का, हा प्रश्न होता. अखेर म्हाडाने या झोपडपट्टीवासियांनाही पुनर्विकासात सहभागी करत मोठा दिलासा दिला आहे. स्टॉलधारकांचेही पुनर्वसन करण्यात येणार आहे. या तिन्ही ठिकाणी मिळून 350 झोपड्या आहेत. या झोपड्यांच्या पात्र-अपात्रतेच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात करण्यात येईल. त्यानुसार पात्र झोपडीधारकांसाठी वरळीत झोपू योजना राबवण्यात येईल आणि त्यांना नियमानुसार 269 चौ. फुटाचे घर देण्यात येणार असल्याचेही लाखे यांनी स्पष्ट केले आहे.

स्टॉलधारकांचीही पात्र-अपात्रता निश्चित करत त्यांचेही पुनर्वसन केले जाणार आहे. त्यांना किती चौ. फुटाचे गाळे द्यायचे हे ही लवकरच निश्चित करण्यात येणार असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन वरळीत करण्यात येणार असल्याने झोपडपट्टीवासियांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. कारण वर्षानुवर्षे जिथे रहातो तिथेच घर मिळावे, अशी मागणी बीडीडीतील एका झोपडपट्टीवासियाने 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा