ठरलं... 22 एप्रिलला फुटणार बीडीडीच्या पुनर्विकासाचा नारळ

  Mumbai
  ठरलं... 22 एप्रिलला फुटणार बीडीडीच्या पुनर्विकासाचा नारळ
  मुंबई  -  

  गेल्या दोन आठवड्यापासून बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन होणार अशी चर्चा होती. अखेर भूमिपूजनाची तारीख म्हाडाकडून निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी 22 एप्रिलला जांबोरी मैदानावर एका शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिली आहे. आठवड्याभरातच बीडीडीच्या पुनर्विकासाचे नारळ फुटणार असून तारीख बुधवारी जाहीर होईल, यासंबंधीचे वृत्त सर्वप्रथम 'मुंबई लाइव्ह'ने प्रसिद्ध केले होते. त्यानुसार बुधवारी म्हाडाने 22 एप्रिल ही भूमिपूजनाची तारीख जाहीर केली असून या सोहळ्याच्या तयारीला वेग दिला आहे.

  [हे पण वाचा - आठवड्याभरात बीडीडीच्या कामाचा नारळ फुटणार]

  शिवडी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळी परिसरात 100 वर्षे जुन्या बीडीडी चाळी असून या चाळींची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर बीडीडीचा पुनर्विकास मार्गी लावणे गरजेचे होते. पण हा प्रकल्प काही मार्गी लागत नव्हता. अखेर सरकारने  म्हाडाकडे पुनर्विकासाची जबाबदारी पोहचवली आणि वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकास काही महिन्यांतच मार्गी लावला आहे. नायगाव आणि ना. म.जोशी मार्ग येथील पुनर्विकासाचे कंत्राट बहाल करण्यात आले असून येथील कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. तर वरळीसाठी नुकत्याच निविदा मागवण्यात आल्या आहेत. या निविदा अंतिम करत वरळीतील कामालाही शक्य तितक्या लवकर सुरुवात करण्याचा म्हाडाचा मानस आहे.

  [हे पण वाचा - भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळणार - बीडीडीवासियांचा म्हाडाला इशारा]

  दरम्यान, शिवडीची जागा ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने येथे पुनर्विकास करणे म्हाडाला-सरकारला शक्य होत नसल्याने शिवडीला पुनर्विकासातून तात्पुरते वगळण्यात आले आहे. मात्र, तरीही ही जागा सरकारकडे हस्तांतरीत करून येथील पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी सरकार आणि म्हाडा प्रयत्न करत आहे. आता बीडीडीचा पुनर्विकास मार्गी लागणार असल्याने वर्षानुवर्षे दहा बाय दहाच्या खोलीत रहाणारे बीडीडीवासीय थेट टॉवरमध्ये मोठ्या घरात रहायला जाणार असल्याने शेकडो बीडीडीवासियांसाठी ही आनंदाची बाब ठरणार आहे. मात्र, तरीही काही बीडीडीवासियांचा म्हाडाला विरोध असल्याने या प्रकल्पात अडचणी निर्माण होणार असल्याचे म्हटले जात आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.