Advertisement

सार्वजनिक शौचालयात ज्येष्ठांना शुल्क माफ


सार्वजनिक शौचालयात ज्येष्ठांना शुल्क माफ
SHARES

मुंबई - मुंबई महापालिकेच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या ‘पैसे द्या आणि वापरा’ तत्वावरील सार्वजिनक शौचालयांमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. महापालिका प्रशासनाने ज्येष्ठांना शुल्कात सवलत देण्याची तयारी दाखवली आहे. ज्येष्ठ नागरिकांकडून सार्वजनिक शौचालयाचा वापर कमी होत असल्याने अशा प्रकारे त्यांना सवलत देण्यास काहीच हरकत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट करत याची त्वरीत अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य सरकारच्या परिपत्रकामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरता शौचालय वापरण्याच्या दरात कोणत्याही प्रकारची सवलत नमूद करण्यात आलेली नाही. परंतु मुंबईमध्ये गर्दीच्या ठिकाणी आणि लोकांची जास्त ये-जा होत असलेल्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचे सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सार्वजनिक शौचालयाच्या वापर ज्येष्ठांसाठी नि:शुल्क करण्यात आल्यास शौचालय चालवणाऱ्या संस्थेचे विशेष नुकसान होणार नाही, असे महापलिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

‘पैसे द्या आणि वापरा’ या तत्त्वावर शौचालय चालविणाऱ्या संस्थांमार्फत मुंबई महापालिकेला कोणताही महसूल प्राप्त होत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना शौचालय नि:शुल्क वापरण्यास दिल्यास महापालिकेचे कोणतेही नुकसान होणार नाही. तसेच महापालिकेवर आर्थिक भार पडणार नाही. त्यामुळे मे 2013मध्ये महापालिका सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार या सूचनेचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे नगरसेविकेने सुचवलेली सूचना आणि महापलिकेने मंजूर केलेल्या ठरावात याची अंमलबजावणी करण्यास आपली हरकत नसल्याचे महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता घनकचरा विभागामार्फत सर्व विभागांना पत्र जारी करून याच्या सूचना संस्था चालकांना कधी देतात याचीच प्रतीक्षा आहे.

महापालिकेच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या ‘पैसे द्या आणि वापरा’ या तत्त्वावरील सार्वजनिक शौचालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येवू नये, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे शिवसेना नगरसेविका आणि विद्यमान उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी केली होती. या सूचनेवर महापालिका प्रशासनाने आपला सकारात्मक अभिप्राय देत याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा