यंदाही म्हाडाची घरांसाठी वणवण

 Mumbai
यंदाही म्हाडाची घरांसाठी वणवण

मुंबई - मुंबईत 2022 पर्यंत 12 लाख घरे बांधू आणि प्रत्येकाच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकार करू, असं सरकार ज्या म्हाडाच्या जिवावर सांगत आहे, त्याच म्हाडाची घरांसाठी वणवण सुरू आहे. मे महिन्यात म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी सोडत काढण्यात येणार असून या सोडतीत समाविष्ट करण्यासाठी मुंबई मंडळाकडे पुरेशी घरेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे सध्या मंडळ घरांच्या शोध मोहिमेत व्यस्त असल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही वर्षात मुंबई मंडळाकडून नवीन गृहप्रकल्प सुरू झालेले नाहीत. तर सुरू असलेल्या प्रकल्पातली घरं पूर्ण झालेली नाहीत. त्यातच म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास रखडलेलाच असून नव्या प्रकल्पांसाठी मंडळाकडे जमीन नाही. परिमाणी कधी काळी मुंबईतील 3 ते 4 हजार घरांसाठी सोडत काढली जात होती तिथे गेल्या तीन-चार वर्षात मंडळाकडून 800 ते 1200 घरांचीच सोडत काढण्यात येत आहे. दरम्यान, मागील वर्षी 2016 मध्ये तर मंडळाला मे मध्ये सोडत काढायची असतानाही एप्रिलपर्यंत सोडतीसाठी घरं मिळाली नव्हती. ओढून ताणून चालू प्रकल्पातील, रखडलेल्या प्रकल्पातील घरांसह विखुरलेली घरे शोधूनही आकडा 500 च्या वर जात नव्हता. त्यामुळे चक्क मुख्यमंत्री कोट्यातील घरे विशेष परवानगीसह सोडतीत समाविष्ट करत म्हाडाने मे महिन्यातील सोडत चक्क ऑगस्टमध्ये काढली. आता यंदाही मंडळाची अशीच दयनीय स्थिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विखुरलेले गाळे आणि इतर चालू प्रकल्पातील घरं मिळून केवळ 600 घरंच सोडतीसाठी उपलब्ध होत आहेत. इतक्या कमी घरांसाठी सोडत काढणे म्हाडासाठी लाजिरवाणे ठरणार असल्याने अधिकाऱ्यांना आणखी घरे शोधण्याचे टार्गेट देण्यात आल्याचे समजते. पण, मुळात म्हाडाकडे घरंच नसल्याने आता घरांचा आकडा कसा फुगवायचा असा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

Loading Comments