Advertisement

म्हाडा विजेत्यांसाठी खूशखबर! घराच्या रक्कमेवरील विलंब शुल्क झाले कमी

विलंब शुल्कावर आकारण्यात येणाऱ्या ११ टक्के व्याजामुळे विजेत्यांवर मोठा आर्थिक भार पडत असल्यानं हे व्याज कमी करण्यात आल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली आहे. ११ टक्क्यांएेवजी आता रिझर्व्ह बँकेच्या 'बेस रेट'वर अनुक्रमे ०.५ टक्के, १ टक्के आणि २ टक्के असं व्याज लावण्यात येणार आहे.

म्हाडा विजेत्यांसाठी खूशखबर! घराच्या रक्कमेवरील विलंब शुल्क झाले कमी
SHARES

म्हाडा प्राधिकरणाने म्हाडाच्या घरांच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी करतानाच घराची रक्कम भरण्यास उशीर झाल्यानंतर आकारण्यात येणारे विलंब शुल्क देखील कमी केले आहेत. म्हाडाच्या घराची लाॅटरी लागलेल्या विजेत्यांसाठी हा डबल दिलासा आहे.

विलंब शुल्कावर आकारण्यात येणाऱ्या ११ टक्के व्याजामुळे विजेत्यांवर मोठा आर्थिक भार पडत असल्यानं हे व्याज कमी करण्यात आल्याची माहिती म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली आहे. ११ टक्क्यांएेवजी आता रिझर्व्ह बँकेच्या 'बेस रेट'वर अनुक्रमे ०.५ टक्के, १ टक्के आणि २ टक्के असं व्याज लावण्यात येणार आहे. या नव्या पद्धतीमुळे व्याज कमी झाले असून विजेत्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचंही सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.


पैसे भरण्यास १९५ दिवसांची मुदत

म्हाडाच्या घरांच्या विजेत्यांची पात्रता निश्चिती झाल्यानंतर त्यांना देकार पत्र पाठवलं जातं. हे देकार पत्र मिळाल्यापासून पहिल्या ४५ दिवसांत घराच्या एकूण रक्कमेच्या २५ टक्के रक्कम विजेत्यांना भरावी लागते. तर उर्वरित ७५ टक्के रक्कम म्हाडाकडून दिलेल्या टप्प्यात भरावी लागते. या टप्प्यात पैसे भरले नाही तर म्हाडाकडे पैसे भरण्यासाठी विजेत्यांना मुदतवाढ घ्यावी लागते. अन्यथा घर हातातून जातं. त्यानुसार विजेत्यांना १९५ दिवसांची मुदत देण्यात येते.


व्याजाचा भार

विजेत्यांना मुदतवाढ मिळते; पण ही मुदतवाढ विजेत्यांचा खिसा आणखी कापते. कारण या मुदतवाढीवर म्हाडा सध्या ७५ टक्के रक्कमेच्या ११ टक्के व्याज आकारते. तेही पहिल्या दिवसापासून रक्कम भरेपर्यंतच्या दिवसांपर्यंत. आधी साडे तेरा टक्के व्याज आकारलं जायचं. ते कमी करून म्हाडानं ११ टक्क्यांवर आणलं. मात्र हे ११ टक्के व्याजही भरमसाठ असून यामुळं विजेत्यांवर मोठा आर्थिक भार पडताना दिसतो. अगदी २०-३० हजारांपासून ४-५ लाखांच्या घरांतही व्याजाची रक्कम जाताना दिसते. त्यामुळं व्याज कमी करावं, अशी मागणी विजेत्यांकडून सातत्यानं होत होती.


व्याजाच्या धोरणात बदल

ही मागणी लक्षात घेत व्याजाच्या धोरणात बदल करण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणानं घेतला होता. त्याप्रमाणे आरबीआयचा बेस रेट आणि त्यावर २ टक्के व्याज १९५ दिवसांच्या मुदतवाढीवर लावण्याचा प्रस्ताव म्हाडानं प्राधिकरणासमोर आणला. मात्र विजेत्यांवरील आर्थिक भार कमी करण्याच्यादृष्टीनं बेस रेट आणि त्यावर सरसकट २ टक्के व्याज न लावता त्याचे टप्पे करण्यात आले.


व्याजाचे टप्पे 'असे'

त्याप्रमाणे मुदतवाढीच्या पहिल्या १५ दिवसांची शून्य टक्के अर्थात व्याज लावण्यात आलेलं नाही. त्यापुढच्या ४५ दिवसांसाठी बेस रेट आणि त्यावर ०.५ टक्के तर पुढच्या ६५ दिवसांसाठी बेस रेट आणि त्यावर १ टक्के आणि पुढील ७५ दिवसांवर बेस रेट आणि त्यावर २ टक्के असं व्याज आकारण्यात आल्याचंही सामंत यांनी सांगितलं आहे. बेस रेट ६.५० टक्के असून त्यावर ०.५ ते २ टक्के टप्प्याटप्प्यात व्याज आकारलं जाणार असल्यानं आता व्याजाची रक्कम खूपच कमी होणार असून त्यामुळं विजेत्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा दावाही सामंत यांनी केला आहे.

यासंबंधीच्या निर्णयाला शुक्रवारी झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहितीही सामंत यांनी दिली आहे. त्यामुळे आता या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार असून त्यानुसार यापुढच्या सर्व विजेत्यांना त्याचा फायदा होणार आहे.



हेही वाचा-

Mumbai Live Impact: म्हाडाच्या घरांच्या किंमती घटल्या; परळमधील दीड कोटीचं घर केवळ ९९ लाखांत

मुंबईत लवकरच पहिला 'पीएमएवाय' प्रकल्प, झोपु प्राधिकरण बांधणार ४७,९८४ घरं



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा