Advertisement

Mumbai Live Impact: म्हाडाच्या घरांच्या किंमती घटल्या; परळमधील दीड कोटीचं घर केवळ ९९ लाखांत

म्हाडानं म्हाडाकडून बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी केल्या आहेत. तर बिल्डरांकडून प्रिमियमच्या रुपानं मिळणाऱ्या घरांच्या किंमतीही कमी केल्या आहेत.

Mumbai Live Impact: म्हाडाच्या घरांच्या किंमती घटल्या; परळमधील दीड कोटीचं घर केवळ ९९ लाखांत
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लाॅटरीतील लोअर परळमधील १ कोटी ९५ लाख आणि १ कोटी ४५ लाख रुपयांची महागडी २८ घरं विजेते आणि प्रतिक्षा यादीवरील विजेत्यांनी नाकारली आहेत. ही घरं मंडळाला परत केली असून हा मंडळासाठी मोठा दणका असल्याची बातमी सर्वप्रथम मुंबई लाइव्हनं दिलं होती. तर यंदाच्या लाॅटरीतील अत्यल्प उत्पन्न गटातील घर ३१ लाखांमध्ये विकलं जाणार असून या घरासाठी विजेत्यांना कोणतीही बँक कर्ज देणार नाही, यासंबंधीचं वृत्तही देत मुंबई लाइव्हनं म्हाडाच्या महागड्या घरांचा विषय उचलून धरला होता.

अखेर म्हाडाला जाग आली असून म्हाडानं म्हाडाकडून बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी केल्या आहेत. तर बिल्डरांकडून प्रिमियमच्या रुपानं मिळणाऱ्या घरांच्या किंमतीही कमी केल्या आहेत. त्यामुळं लोअर  परळमधील १ कोटी ९५ लाखांचं घर आता अंदाजे दीड कोटीत तर १ कोटी ४५ लाखांचं घर केवळ ९९ लाखांत दिलं जाणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली आहे.



विजेत्यांना दिलासा 

यासंबंधीच्या प्रस्तावाला म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत हिरवा कंदील देण्यात आला आहे. तर म्हाडा घरांच्या किंमतीबाबतच्या या सुधारीत अाणि नव्या धोरणानुसारच आगामी लाॅटरीच्या घरांच्या किंमती ठरवण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या लाॅटरीतील ३१ लाखांचं घर २२ लाखांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही विजेत्यांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.


घरं नाकारली

गेल्या काही वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या किंमती वाढतच चालल्या असून ही घरं विजेत्यांना परवडेनाशी झाली आहेत. त्यामुळेच पवई-तुंगा, विरार-बोळींज आणि परळ येथील महागडी घरं  विजेत्यांनीच नव्हे तर प्रतिक्षायादीवरील विजेत्यांनीही नाकारली आहेत. परळमधील ३६ पैकी २८ घरं विक्रीवाचून धूळ खात पडली असून त्यामुळं मंडळाला मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे. 


टिकेनंतर नवीन धोरण

 यंदाच्या सोडतीतील घरांच्या किंमतीही आव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत. त्यामुळं म्हाडावर टीकाही होत होती. या पार्श्वभूमीवर किंमतीच्या धोरणात बदल करत घर स्वस्त करण्याचा निर्णय म्हाडानं घेतला होता. त्यानुसार एका माजी म्हाडा अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली अखेर नवीन धोरण तयार करत शुक्रवारी त्याला मंजुरी देण्यात आली आहे.


इतरही शुल्क कमी 

या नव्या धोरणाप्रमाणं आता म्हाडानं बांधलेल्या घरांच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. म्हाडाच्या अाधीच्या धोरणानुसार घर जरी पाच वा दहा वर्षांपूर्वी बांधलं असलं तरी ज्या वर्षात घर विकलं जाणार आहे त्या वर्षाच्या किंमतीनुसार घराची किंमत काढली जात होती. त्यामुळं घरांच्या किंमती वाढल्या होत्या. आता मात्र घर कोणत्या वर्षी बांधलं त्यानुसार घरांच्या किंमती काढल्या जाणार आहेत. तर इतरही शुल्क कमी करण्यात आलं आहे. याअनुषंगानं म्हाडानं बांधलेल्या घरांच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी कमी होणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं आहे.


इतके घटले दर

म्हाडानं बांधलेल्या घरांबरोबरच म्हाडाला बिल्डरकडून प्रिमियमच्या रूपानं मिळालेल्या घरांच्या किंमतीही कमी करण्यात आल्या आहेत. ही घरं रेडीरेकनरच्या दरानं विकलं जात होती. पण यापुढं ही घरं रेडीकनरच्या ३० ते ७० टक्के कमी दरांनी विकली जाणार आहेत. म्हणजेच उच्च उत्पन्न गटातील घर यापुढं रेडीरेकनरच्या ७० टक्के दरानं, मध्यम गटातील घरं रेडीरेकनरच्या ६० टक्के दरानं, अल्प गटातील घरं रेडीरेकनरच्या ५० टक्के दरानं तर अत्यल्प गटातील घरं रेडीरेकनरच्या ३० टक्के दरानं विकली जाणार आहे.


घराचं स्वप्न पूर्ण

दर घटल्याने याआधी लोअर परळमधील उच्च गटातील १ कोटी ९५ लाखांत विकण्यात आलेलं घर आता यंदाच्या लाॅटरीत अंदाजे दीड लाखांत, तर १ कोटी ४५ लाखांतील घर अंदाजे ९९ लाखांत विकलं जाणार आहे. त्यामुळे हा आगामी लाॅटरीतील विजेत्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळं आता सर्वच जण सुखावणार असून हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणंही आता सोपं होणार असल्याचं म्हटलं जात आहे.



हेही वाचा - 
मुंबईत लवकरच पहिला 'पीएमएवाय' प्रकल्प, झोपु प्राधिकरण बांधणार ४७,९८४ घरं

Mumbai Live Impact: दडवलेली 'ती' २६९ घरं म्हाडाने काढली बाहेर




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा