Advertisement

मुलुंडमधील म्हाडाच्या १८२ घरांना अखेर अडीच वर्षांनंतर ओसी, विजेत्यांना दिलासा


मुलुंडमधील म्हाडाच्या १८२ घरांना अखेर अडीच वर्षांनंतर ओसी, विजेत्यांना दिलासा
SHARES

'सरकारी काम आणि बारा महिने थांब' याचा अनुभव गेल्या अडीच वर्षांपासून म्हाडाच्या मे २०१५ मधील लाॅटरीतील मुलुंड, गव्हाणपाडा येथील १८२ विजेते घेत आहेत. या घरांना ओसी नसल्याने मुंबई मंडळाकडून विजेत्यांना या घरांचा ताब्यात देण्यात येत नव्हता. मात्र आता या घरांना ओसी मिळाल्याने लवकरच ही घरे विजेत्यांना सुपूर्द करण्यात येतील.


स्वप्न अधांतरी

म्हाडाच्या मुलुंड, गव्हाणपाडा येथील घरांसाठी विजेते ठरल्यानंतर विजेत्यांनी म्हाडाकडे कागदपत्र सादर केली, त्यातील अनेकजण घरासाठी पात्र ठरले, घराचा ताबा घेण्यासाठी पैशांची जुळवाजुळवही केली, पण हक्काच्या घरात राहायला जाण्याचं स्वप्न काही केल्या पूर्ण होत नव्हतं. कारण या १८२ घरांना ओसीचं नसल्यानं म्हाडाच्या मुंबई मंडळाला विजेत्यांना घराचा ताबा देता येत नव्हता.


ओसी मिळाली

मात्र आता या १८२ घरांना ओसी मिळाल्याची माहिती मुंबई मंडळाच्या पणन विभागाचे उपमुख्य अधिकारी भगवान सांवत यांनी दिली आहे. ओसी मिळाल्याने विजेत्यांना लवकरच हक्काच्या घराचं वितरण करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.


नेमकी काय अडचण?

मे २०१५ मध्ये काढण्यात आलेल्या ९९७ घरांच्या लाॅटरीत मुलुंड गव्हाणपाडा येथील मध्यमगटातील १८५ तर अल्प गटातील १८२ घरांचा समावेश होता. चालू प्रकल्पातील ही घरं असल्यानं बांधकाम पूर्ण होऊन ओसी मिळेपर्यंत विजेत्यांची पात्रता निश्चिती करून घेण्याचा निर्णय त्यावेळी मुंबई मंडळाने घेतला. त्यानुसार पात्रता निश्चिती झाली, घरांचं बांधकामही पूर्ण झालं. पण घरांचा ताबा काही मिळाला नाही.

महापालिकेकडून ओसी मिळवून घेण्यात अनेक तांत्रिक अडचणी आल्यानं मुंबई मंडाळाचा महापालिकेकडे ओसीसाठी पाठपुरावा सुरू होता. अनेक प्रयत्नानंतर मध्यमगटातील १८५ घरांना काही महिन्यांपूर्वी ओसी मिळाली. पण अल्प गटातील १८२ घरांच्या ओसीचा प्रश्न जसाच तसाच होता.


लवकरच देकारपत्र

ओसीमुळे हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होत नसल्याने नाराज विजेते सातत्यानं मुंबई मंडळाकडे ताबा मिळावा यासाठी पाठपुरावा करत होते. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडत होती. अखेर अडीच वर्षानंतर या १८२ घरांना गेल्या आठवड्यात ओसी मिळाली. ओसी मिळाल्याने पुढच्या आठवड्यात पात्र विजेत्यांना देकारपत्र (पीओएल) पाठवत घराची रक्कम भरून घेण्यास सुरूवात करण्यात येणार असल्याचंही सावंत यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

ओसी नसलेल्या इमारतींनाही सदनिकानिहाय मालमत्ता कर?

धक्कादायक! ओसी नसतानाही म्हाडाने भरून घेतली घराची रक्कम!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा