Advertisement

म्हाडाची आता जमीन शोध मोहीम, आऊट सोर्सिंगद्वारे शोधणार जमिनी

मुंबईत आणि राज्यात म्हाडाच्या मालकीच्या मोठ्या संख्येने जागा होत्या. ज्या जागा रिकाम्या होत्या त्या जागांवर म्हाडानं म्हाडा वसाहती वसवल्या. तर ज्या जागांकडे म्हाडाचं दुर्लक्ष झालं त्या जागांवर अतिक्रमणं झाली. आता ही अतिक्रमणंच म्हाडासाठी डोकेदुखी ठरत आहेत.

म्हाडाची आता जमीन शोध मोहीम, आऊट सोर्सिंगद्वारे शोधणार जमिनी
SHARES

मुंबईसह राज्यभरातील लाखो बेघरांना हक्काचा निवारा देण्याची मोठी जबाबदारी म्हाडा प्राधिकरणावर आहे. मात्र गेल्या काही वर्षात राज्यात त्यातही मुंबईत म्हाडाकडे मोकळ्या जमिनीच नसल्यानं अधिकाधिक संख्येनं घरांची निर्मिती करत बेघरांना घरं देण्याचं उद्दीष्ट गाठण्यात अडचणी निर्माण होत आहेत. मुंबईत तर जवळजवळ म्हाडाकडे जमीन नसल्यासारखंच आहे. 

 जमिनीची ही अडचण लक्षात घेता आता म्हाडानं जमीन शोध मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आऊट सोर्सिंगद्वारे मुंबईसह राज्यभरात म्हाडाच्या कुठं आणि किती जमिनी आहेत, कोणत्या जमिनीवर किती अतिक्रमण आहे याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती म्हाडा प्राधिकरणाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.


अतिक्रमण डोकेदुखी 

मुंबईत आणि राज्यात म्हाडाच्या मालकीच्या मोठ्या संख्येने जागा होत्या. ज्या जागा रिकाम्या होत्या त्या जागांवर म्हाडानं म्हाडा वसाहती वसवल्या. तर ज्या जागांकडे म्हाडाचं दुर्लक्ष झालं त्या जागांवर अतिक्रमणं झाली. आता ही अतिक्रमणंच म्हाडासाठी डोकेदुखी ठरत आहेत. सध्या मुंबईत म्हाडाकडे घर बांधण्यासाठी मोकळ्या जमिनी नाहीत. त्यातच खासगी जमिनी खरेदी करायच्या म्हटल्यास त्यासाठी भरमसाठ रक्कम दिली तर त्याचा परिणाम घरांच्या किंमती वाढण्यावर होतो. विकत घेतलेल्या जमिनीवरील घर मग सर्वसामान्यांना परवडत नाहीत. त्यामुळे मुंबईत म्हाडाला सध्या तरी पुनर्विकासावरच अवलंबून राहावं लागत आहे. 


अतिक्रमणाची माहिती नाही

हीच परिस्थिती थोड्याफार प्रमाणात राज्यातही आहे. राज्यातही म्हाडाकडे आता म्हणाव्या तशा मोकळ्या जमिनी नाहीत. त्यामुळे आता म्हाडा प्राधिकरणानं नुकत्याच झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत धोरणात्मक निर्णयांतर्गत मुंबई आणि राज्यातील जमिनीची शोध मोहीम राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे. कारण म्हाडाकडे सध्या किती जमीन आहे, त्यातल्या किती जमिनीवर बांधकाम झालं आहे आणि अजून किती जमिनी बांधकाम न झालेल्या अाहेत,  किती जमिनीवर अतिक्रमण आहे याची कोणतीही सविस्तर माहिती म्हाडाकडे नाही. त्यामुळेच आता आऊट सोर्सिंगद्वारे ही माहिती म्हाडा मिळवणार आहे.


जानेवारीत निविदा 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) ने मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गाचा आराखडा तयार करण्याआधी ज्याप्रमाणे आपल्या मालकीच्या जमिनीची शोध घेतला, त्याप्रमाणेच म्हाडाही जमिनींची शोध मोहीम राबवणार आहे. जानेवारीत यासाठी निविदा काढण्यात येईल आणि त्यानंतर कंपनीची नेमणूक करत या कंपनीला निर्धारित वेळेत जमिनीची शोध मोहीम पूर्ण करण्याचं टार्गेट दिलं जाईल, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. तर या अभ्यासातून मोठ्या प्रमाणावर जमिनी मिळण्याचा आणि त्यातून घरांची निर्मिती होण्याचा विश्वास म्हाडाला आहे. त्यामुळे असं झाल्यास ही सर्वसामान्यांसाठीही नक्कीच आनंदाची बाब ठरेल. 



हेही वाचा - 

Exclusive : वर्तकनगर पोलिस वसाहतीचा म्हाडा करणार पुनर्विकास, अतिरिक्त १००० घरं मिळण्याची शक्यता

मोतीलाल नगरचा पुनर्विकास मार्गी! फेब्रुवारीत काढणार निविदा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा