Advertisement

एमआयजी क्लबला म्हाडाचा दणका, कराराचं उल्लंघन केल्याप्रकरणी ५३ कोटींचा दंड

विनामुल्य शाळा बांधून न देणाऱ्या एमआयजी क्लबला म्हाडा प्राधिकरणाने गुरूवारी ५३ कोटींचा दंड ठोठावल्याची माहिती म्हाडा प्राधिकरणाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

एमआयजी क्लबला म्हाडाचा दणका, कराराचं उल्लंघन केल्याप्रकरणी ५३ कोटींचा दंड
SHARES

वांद्रयातील नामांकित अशा एमआयजी क्लबला म्हाडानं अखेर चांगलाच दणका दिला आहे. एमआयजी क्लबने म्हाडाशी झालेल्या भुखंडाच्या भाडेतत्वाच्या कराराचा भंग केल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं या करारानुसार विनामुल्य शाळा बांधून न देणाऱ्या एमआयजी क्लबला म्हाडा प्राधिकरणाने गुरूवारी ५३ कोटींचा दंड ठोठावल्याची माहिती म्हाडा प्राधिकरणाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. यासंबंधी लवकरच एमआयजी क्लबला नोटीस पाठवत त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं आहे.


भाडेतत्वावर भुखंडाचं वितरण

म्हाडाने काही वर्षांपूर्वी एमआयजी येथील भुखंड एमआयजी क्लबला भाडेतत्वावर दिला होता. या भुखंडाला लागू पालिकेची एक शाळा होती. तर भुखंडावर नवजीवन शिक्षण संस्थेची अभिनव विद्यालय ही शाळा होती. भुखंडावर शाळेचं आरक्षण असल्यानं म्हाडा आणि एमआयजीमध्ये झालेल्या करारानुसार एमआयजी क्लबने नवजीवन शिक्षण संस्थेला विनामूल्य शाळेची इमारत बांधून देणं बंधनकारक होतं. नवजीवन संस्था शाळा पाडत एमआयजी क्लबने भलं मोठं मैदान आणि एमआयजी क्लबची इमारत उभारली. या क्लबमध्ये क्रिकेटपटू, खेळाडू आणि राजकारण्यांची ये-जा असते. एमआयजी क्लबची ओळख एक नामांकित क्लब म्हणून निर्माण झाली. मात्र त्याचवेळी एमआयजी क्लबला शाळा बांधून देण्याचा विसर पडला.


शाळेच्या इमारतीची प्रतिक्षा

दरम्यान शाळेला जागा नसल्यानं काही वर्षांपूर्वी पालिकेच्या छोट्याशा शाळेत नवजीवन शिक्षण संस्थेची शाळा हलवण्यात आली आहे. तर पालिकेची शाळा समोरच्या गांधीनगर म्हाडा वसाहतीतील इमारतीत हलवण्यात आली आहे. दरम्यान शाळा बांधून द्यावी यासाठी नवजीवन शिक्षण संस्थेकडून सातत्यानं पाठपुरावा केला जात आहे. मात्र एमआयजी क्लबकडून अजूनही टाळाटाळ सुरू आहे.


५३ कोटी वसूल करणार

शेवटी या सर्व प्रकरणाची गंभीर दखल म्हाडा प्राधिकरणानं घेतली आहे. त्यानुसार म्हाडाच्या चौकशीत एमआयजी क्लबनं कराराचा भंग केल्याचं निष्पन्न झाल्याचं म्हणत एमआयजी क्लबला अखेर ५३ कोटींचा दंड ठोठावला आहे. गुरूवारी झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं आहे. आता लवकरच ही रक्कम वसूल करत त्यातून शाळा बांधण्याचं काम करण्यात येणार असल्याचंही सामंत यांनी सांगितलं आहे.

एमआयजी क्लबसाठी हा मोठा दणका मानला जात आहे. याविषयी एमआयजी क्लबचे अध्यक्ष संजीव पत्की यांना विचारलं असता त्यांनी म्हाडाकडून अद्यापपर्यंत यासंबंधी आम्हाला कोणतीही नोटीस वा पत्र आलेलं नाही. यासंंबंधीचं अधिकृत कागदपत्र मिळाल्यानंतरच यावर बोलता येईल असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी शाळा बांधण्याच्या कामाला आम्ही सुरूवात केली होती, मात्र काही अडचणींमुळे काम थांबल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा -

मध्य रेल्वेवर २४ आणि २६ जानेवारीच्या मध्यरात्री विशेष ब्लाॅक

लोअर परेल ते चर्चगेट मार्गावर ११ तासांसाठी मेगाब्लॉक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा