SHARE

मुंबई - मेट्रो-3 अंर्तगत मरोळ गावठाण येथील पाली मैदान येथे रात्रीच्या वेळेस सुरू असलेले मेट्रो-3 चे काम अखेर बंद केले आहे. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत काम बंद करत मरोळ गावठाणमधील रहिवाशांना दिलासा दिला आहे.

न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री 10 ते सकाळी 6 यावेळेत आवाजावर बंदी आहे. तर सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत किती डेसीबल आवाज असावा याच्याही मर्यादा आहेत. असे असताना मेट्रो-3 कडून रात्री 10 नंतरही काम करण्यात येत होते आणि त्यातही मोठाल्या मशिन चालवल्या जात होत्या. या मशिनच्या आवाजामुळे रहिवाशांची रात्रीची झोप उडाली होती. त्यामुळे रहिवाशांनी कंत्राटदार आणि एमएमआरसीकडे यासंबंधी तक्रार केली होती. पण कंत्राटदार आणि एमएमआरसीने काम बंद करणार नाही अशी आठमुठी भूमिका घेतल्याने रहिवाशांनी थेट न्यायालयात धाव घेतली. त्याचवेळी प्रसारमाध्यमांतूनही यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर मात्र कंत्राटदार आणि एमएमआरसी नरमले आणि नुकताच रात्रीच्या वेळेस काम बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळेस काम बंद करण्यात आल्याची माहिती येथील रहिवाशी अॅड, गॉडफ्रे पीमेन्टा यांनी दिली आहे.

रात्रीच्या वेळेस काम बंद झाल्याने रहिवाशी खुश आहेत. पण दुपारच्या वेळेस सुरू असलेल्या कामाचा आवाज अजूनही प्रचंड आहे. त्यामुळे हा आवाज कमी करण्यासाठी नॉईज बॅरिअर आणि साऊंड फ्रुफ विन्डो लावण्यासारख्या उपाययोजना त्वरित करण्याची मागणी आता रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या